RTO Exposing the Hidden Truth Part 2

परिवहन विभागाच्या कारभाराचे नवनवे गौप्यस्फोट!

पीयूसी केंद्र चालक आणि सायबर भामट्यांचे साटेलोटे? सत्यउपासकच्या एक्सक्लुझिव्ह तपास मोहिमेनंतर बनावट ई-चलनाचा धक्कादायक प्रकार!

सत्यउपासक विशेष वृत्त: पीयूसी केंद्रांमधील कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठी सत्यउपासक वृत्त समूहाने यापूर्वी स्वतःच्या वाहनाचा क्रमांक वापरून, वाहनाची प्रदूषण नियंत्रण तपासणी (पीयूसी) करून घ्यायची असल्याचे सांगत प्रत्यक्ष पीयूसी केंद्रांवर जाऊन विशेष तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान पीयूसी प्रमाणपत्राच्या नावाखाली वाहनधारकांची आर्थिक लूट तसेच मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत पैशांची मागणी होत असल्याचे संशयास्पद प्रकार समोर आणण्यात आले होते. सदर बातमीची लिंक पुढील प्रमाणे

https://satyaupasak.com/puc-fraud-where-is-rto-vigilance/

मात्र, आता याच तपास मोहिमेसाठी वापरण्यात आलेल्या वाहन क्रमांकावरच ५०० रुपयांचा दंड आकारला असल्याचा बनावट संदेश एका खासगी मोबाईल क्रमांकावरून आल्याने या प्रकरणाला नवे आणि अधिक गंभीर वळण मिळाले आहे; सत्यउपासकच्या तपास मोहिमेनंतर लगेचच घडलेल्या या घटनाक्रमामुळे आता पीयूसी केंद्र आणि सायबर फसवणूक करणाऱ्या घटकांमधील संबंधांचा गंभीर संशय निर्माण झाला असून पीयूसी केंद्र चालक आणि सायबर फसवणूक करणारे यांच्यात काही आर्थिक साटेलोटे किंवा मिलीभगत आहे का, या दिशेने तपास होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.  पीयूसी केंद्रांवर वाहनधारकांकडून संकलित होणारी माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत ताबडतोब कशी पोहोचते आणि या माहितीचा गैरवापर करून बनावट ई-चलन संदेशांद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणुक केली जाते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पीयूसी केंद्रे आणि परिवहन विभागाची माहिती यंत्रणा आणि सायबर गुन्हेगारी यांच्यातील संभाव्य संबंधांची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशा प्रकारे वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसीच्या प्रक्रियेतच गैरप्रकार होत असतील आणि या प्रक्रियेत वाहनधारकांनी दिलेल्या माहितीचा वापर पुढे सायबर फसवणुकीसाठी केला जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

पियुसी केंद्र आणि सायबर गुन्हेगार यांचे लागेबांधे!

सत्यउपासक वृत्त समूहाच्या तपास मोहिमेदरम्यान एका वाहनाचा क्रमांक पीयूसी प्रक्रियेच्या अनुषंगाने संबंधित केंद्राला देण्यात आला होता. या तपास मोहिमेत वाहनधारकांना प्रत्यक्ष पीयूसी प्रक्रियेत कोणत्या अडचणी येतात, केंद्र चालकांकडून कोणत्या पद्धतीने व्यवहार केले जातात आणि वाहनांची माहिती कशा प्रकारे घेतली जाते, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत होती. या प्रक्रियेदरम्यान संबंधित वाहनाचा क्रमांक पीयूसी केंद्राशी संबंधित प्रक्रियेत वापरण्यात आला. विशेष म्हणजे, या तपास मोहिमेनंतर लगेचच सत्यउपासक वृत्त समूहाच्या मोबाईल क्रमांकावर त्याच वाहन क्रमांकासाठी ५०० रुपयांचा Traffic Fine असल्याचा संदेश प्राप्त झाला. या संदेशात MH12UJ3725 या वाहन क्रमांकावर वाहतूक नियमभंगाचा दंड आकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच IJ42032607164 हा संदर्भ क्रमांक देऊन दंडाचा तपशील पाहण्यासाठी https://mparivahan.dapit.net/343337/ ही लिंक पाठविण्यात आली होती.

त्यामुळे पीयूसी केंद्राच्या प्रक्रियेत वापरण्यात आलेला वाहन क्रमांक आणि त्यानंतर खासगी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या दंडाच्या संदेशातील वाहन क्रमांक एकच असल्याची बाब समोर आली. हा केवळ योगायोग आहे की पीयूसी केंद्रांमध्ये दिलेल्या वाहनांच्या माहितीचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने वाहनधारकांना सायबर फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

पीयूसी केंद्र आणि सायबर गुन्हेगार यांचे झारखंड कनेक्शन!!!

संबंधित संदेशाचे परीक्षण केले असता त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली; संदेशामध्ये mParivahan या केंद्र सरकारच्या अधिकृत परिवहन सेवेच्या नावाशी साधर्म्य असलेल्या शब्दाचा वापर करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, संदेशासोबत दिलेल्या लिंकचे मूळ डोमेन dapit.net असे आहे. म्हणजेच mparivahan हा त्या संकेतस्थळावरील उपडोमेनचा भाग असून मूळ डोमेन भारत सरकारच्या अधिकृत parivahan.gov.in या डोमेनशी संबंधित असल्याचे कोणतेही प्रमाण उपलब्ध नाही. अधिकृत ई-चलन तपासणीसाठी केंद्र सरकारचे echallan.parivahan.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असताना खासगी डोमेनवर तयार करण्यात आलेल्या अशा संशयास्पद लिंकचा वापर करून नागरिकांना दंड भरण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे दिसून येते. या लिंकबाबत ऑनलाइन सायबर सुरक्षा तपासणी सेवेकडूनही फिशिंगचा इशारा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे हा संदेश अधिकृत सरकारी यंत्रणेकडून पाठविण्यात आल्याचा समज करून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.

विशेष म्हणजे, हा संदेश कोणत्याही अधिकृत परिवहन विभागाच्या संदेश प्रणालीतून नव्हे, तर ९५०८३९२२६६ या खासगी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झाला होता. या क्रमांकावर सत्यउपासक वृत्त समूहाने थेट संपर्क साधून संदेशाबाबत विचारणा केली. यावेळी अन्सारी नावाच्या व्यक्तीने फोन उचलला आणि आपण झारखंड येथे असल्याचे सांगितले. संबंधित वाहन क्रमांकावर ५०० रुपयांचा दंड असल्याचा संदेश आपण कोणत्या आधारावर पाठविला, तसेच अधिकृत परिवहन विभागाशी संबंध नसलेल्या खासगी डोमेनवरील लिंकचा वापर का करण्यात आला, याबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने अत्यंत उर्मट आणि आव्हानात्मक भूमिका घेतली. ‘तुम्ही पोलीस चौकीत तक्रार केली तरी माझे काहीही बिघडणार नाही. मी झारखंडमध्ये आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’ अशा आशयाचे वक्तव्य त्याने संभाषणादरम्यान केल्याचे ध्वनिमुद्रणात ऐकायला मिळते. विशेष म्हणजे, सत्यउपासक वृत्त समूहाच्या प्रतिनिधीने स्वतःची ओळख सांगून आपण मीडिया कार्यालयातून बोलत असल्याचे स्पष्ट करताच संबंधित व्यक्तीने अचानक फोन बंद केला. या संपूर्ण संभाषणाचे ध्वनिमुद्रण सत्यउपासक वृत्त समूहाकडे उपलब्ध असून, संबंधित व्यक्तीची ओळख आणि त्याच्या वक्तव्यांची सत्यता तपास यंत्रणांनी स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे.

२१ नोव्हेंबरला पीयूसी प्रक्रिया, २३ नोव्हेंबरला त्याच वाहन क्रमांकावर बनावट ई-चलनाचा संदेश सत्यउपासकचा थेट आरोप!

पीयूसी केंद्रातूनच सायबर फसवणुकीची सुरुवात होत आहे का, असा नव्हे, तर या संपूर्ण घटनाक्रमामागे पीयूसी केंद्रातील माहितीचा गैरवापर होत असल्याचा सत्यउपासक वृत्त समूहाचा ठाम आरोप असून, त्यादृष्टीने संबंधित केंद्रांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. कारण, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित वाहन पीयूसी प्रक्रियेसाठी केंद्रावर नेण्यात आले होते आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे २३ नोव्हेंबर २०२६ रोजी, त्याच वाहन क्रमांकावर ५०० रुपयांचा वाहतूक दंड असल्याचा बनावट संदेश सत्यउपासकच्या मोबाईलवर प्राप्त झाला यामुळे पीयूसी केंद्राच्या प्रक्रियेत वापरलेला वाहन क्रमांक काही वेळातच बनावट दंडाच्या संदेशात कसा पोहोचला? वाहनधारकांची माहिती पीयूसी केंद्रांमधून बाहेर जात आहे का? काही पीयूसी केंद्र चालक आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांमध्ये आर्थिक अथवा माहितीच्या देवाणघेवाणीचे साटेलोटे आहे का? झारखंडमध्ये असल्याचा दावा करून पोलिसांत तक्रार केली तरी काही बिघडणार नसल्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीमागे नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? सत्यउपासक वृत्त समूहाने उघडकीस आणलेल्या या घटनाक्रमातील धागेदोरे जोडून पीयूसी केंद्रांपासून ते सायबर फसवणूक करणाऱ्या घटकांपर्यंत संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आता परिवहन विभाग आणि सायबर पोलिसांसमोर आहे. नागरिकांच्या वाहनांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या व्यवस्थेतूनच माहिती बाहेर जात असेल, तर ही बाब केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारी गंभीर बाब ठरेल. पीयूसीच्या नावाखाली वाहनधारकांची माहिती गोळा करून त्याच माहितीचा वापर सायबर फसवणुकीसाठी होत आहे का, याचा आता केवळ संशय नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे पर्दाफाश होणे आवश्यक आहे.

सत्यउपासक वृत्त समूहाची परिवहन विभाग आणि सायबर क्राईम विभागाकडे संयुक्त चौकशी व कठोर कारवाईची मागणी…

या संपूर्ण घटनाक्रमाचे गांभीर्य लक्षात घेता सत्यउपासक वृत्त समूहाकडून परिवहन विभाग आणि सायबर क्राईम विभागाकडे संयुक्त चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेषतः २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पीयूसी प्रक्रियेसाठी संबंधित वाहन पीयूसी केंद्रावर नेण्यात आले आणि अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे २३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याच वाहन क्रमांकावर ५०० रुपयांच्या वाहतूक दंडाचा संशयास्पद संदेश खासगी मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झाला. हा घटनाक्रम केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित न करता पीयूसी केंद्रातील माहितीच्या हाताळणीपासून ते बनावट ई-चलनाचा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीपर्यंत संपूर्ण साखळीची चौकशी करण्यात यावी. पीयूसी केंद्र चालकांकडून वाहनधारकांची माहिती सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना पुरविली जात आहे का, या माहितीच्या आधारे नागरिकांना लक्ष्य केले जात आहे का आणि काही पीयूसी केंद्र चालक व सायबर गुन्हेगार यांच्यात परस्पर आर्थिक व्यवहार अथवा माहितीची देवाणघेवाण होत आहे का, याचा तपास प्राधान्याने करावा. यासाठी संबंधित पीयूसी केंद्रातील वाहन क्रमांक नोंदविण्याच्या नोंदी, २१ नोव्हेंबरच्या व्यवहारांचे तपशील, ऑनलाइन प्रणालीतील लॉगिन आणि प्रवेश नोंदी, माहिती हाताळणाऱ्या व्यक्तींची भूमिका तसेच संबंधित मोबाईल क्रमांक ९५०८३९२२६६ चा ग्राहक तपशील, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि संदेश पाठविण्याचा तांत्रिक स्रोत तपासण्यात यावा. त्याचबरोबर mparivahan.dapit.net या संशयास्पद डोमेनची नोंदणी, सर्व्हर लॉग, लिंकचे रीडायरेक्शन, संभाव्य आर्थिक व्यवहार आणि त्यामागील व्यक्ती अथवा यंत्रणेचा शोध घेण्यात यावा. झारखंडमध्ये असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची वास्तविक ओळख आणि या संपूर्ण प्रकरणातील भूमिका निश्चित करून आवश्यक असल्यास आंतरराज्यीय सायबर तपासाची कार्यवाही करावी. यापूर्वी महाराष्ट्रात बनावट ई-चलन लिंक आणि APK फाइलच्या माध्यमातून २०२५ मध्ये १९३ गुन्हे दाखल होऊन ३६ जणांना अटक झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली होती, तर पुण्यात अशाच प्रकारच्या बनावट mParivahan संदेशातून एका नागरिकाची ५ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची केवळ एका बनावट संदेशापुरती चौकशी न करता संभाव्य संघटित सायबर फसवणुकीचे जाळे उघड करण्याच्या दृष्टीने तपास करावा, अशी सत्यउपासक वृत्त समूहाची मागणी आहे. नागरिकांच्या वाहनांची आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी असलेल्या पीयूसी व्यवस्थेतूनच माहिती बाहेर जात असल्याचा संशय निर्माण होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच संशयास्पद संदेश प्राप्त झालेल्या विशिष्ट लिंकद्वारे किती नागरिकांची फसवणूक झाली, याची अधिकृत माहिती मिळवून संभाव्य पीडितांचा शोध घ्यावा. दरम्यान, नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या दंडाच्या संदेशातील लिंकवर क्लिक करू नये, कोणतीही APK फाइल डाउनलोड करू नये किंवा बँकिंग तपशील, कार्डची माहिती अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये. वाहतूक दंडाची सत्यता केवळ केंद्र सरकारच्या अधिकृत echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर तपासावी. आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी. पीयूसी केंद्रातून वाहनधारकांची माहिती बाहेर जात असेल आणि त्याच माहितीचा वापर करून सायबर फसवणूक केली जात असेल, तर या संपूर्ण साखळीतील प्रत्येक संबंधित घटकाची जबाबदारी निश्चित करून कारवाई झालीच पाहिजे. केवळ बनावट संदेश पाठविणाऱ्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेऊन थांबू नये, तर या फसवणुकीची सुरुवात नेमकी कुठून झाली, याचा पर्दाफाश करावा, हीच सत्यउपासक वृत्त समूहाची ठाम मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!