Ajitdada Pawar’s Name Given to

अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण…

 

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

 

मुंबई, दि. १३ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून करण्यात आली होती.

  देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने जारी केला आहे.

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने पुणे येथील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या १२२ व्या बैठकीत या केंद्राला “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नाव देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत आहे. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याने केंद्राच्या कार्याला नवी ओळख मिळण्यासोबतच संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!