पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर करू नये; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नागरिकांना आवाहन
पुणे, दि. २७ : रॅपिडो (Rapido) कंपनीने पुणे जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवान्याविना बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत संबंधित कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेसाठी असलेल्या भ्रमणध्वनीवरील अनुप्रयोगाचा वापर करू नये, असे आवाहन पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
रॅपिडो कंपनीने बाइक टॅक्सी सेवेसाठी पुणे जिल्ह्याकरिता आवश्यक एकत्रीकारक परवाना घेतलेला नसतानाही पुणे शहरात व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य, अन्य कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच स्वयंचलित रिक्षा व विद्युत दुचाकी टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत संबंधित कंपनीने विद्युत दुचाकी टॅक्सी एकत्रीकारक परवाना प्राप्त होईपर्यंत पुणे जिल्ह्यात विनापरवाना सुरू केलेली बाइक टॅक्सी सेवा तातडीने पूर्णपणे बंद करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तसेच विनापरवाना बाइक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध पोलिस विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, त्यानंतरही रॅपिडो कंपनीने बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी व पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड वायुवेग पथकाने रॅपिडो ॲपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई करून एकूण ५६ हजार रुपये दंड आकारला आहे. तसेच संबंधित कंपनीचा अनुप्रयोग बंद करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागामार्फत सुरू आहे.
दुचाकी वाहनमालकांनाही सूचना: पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी अनुप्रयोगाचा वापर करू नये. तसेच दुचाकी वाहनमालकांनी आपली खासगी दुचाकी या अनुप्रयोगावर नोंदवून बाइक टॅक्सी सेवेसाठी उपलब्ध करून देऊ नये. तपासणीदरम्यान अशा प्रकारे खासगी दुचाकी वाहनाचा वापर होत असल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदी व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी विनापरवाना बाइक टॅक्सी सेवेचा वापर करू नये तसेच संबंधित अनुप्रयोगावर आपल्या दुचाकी वाहनाची नोंदणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.