Traffic Diversions Swargate–Katraj Underground Metro Construction Work

स्वारगेट–कात्रज भूमिगत मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल; मार्केट यार्ड परिसरातील वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

सत्यउपासक/ पुणे, दि. २१ : स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार काही चौकांतून उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

अपर बिबवेवाडीकडून चंद्रलोक चौकमार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केट यार्ड आणि उत्सव हॉटेलच्या दिशेने उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी पुष्पमंगल चौकातून डावीकडे वळून तनिष्क शोरूमसमोरून अरणेश्वर बसथांब्याजवळ यू-टर्न घेऊन स्वारगेटच्या दिशेने जावे.

स्वारगेटकडून पुणे-सातारा रस्त्याने तसेच मार्केट यार्डकडून सातारा, कात्रज आणि बिबवेवाडीकडे जाणारी वाहतूक वेलनेस मेडिकल स्टोअर आणि भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकातून कात्रज-अपर बिबवेवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे.

दरम्यान, पुष्पमंगल चौकातून मार्केट यार्ड आणि उत्सव हॉटेल चौकाच्या दिशेने उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच मार्केट यार्ड येथील उत्सव हॉटेल चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही उजवीकडे वळता येणार नाही. मार्केट यार्डकडून येणाऱ्या वाहनचालकांनी वखार महामंडळ चौकातून इच्छित स्थळी जावे. पर्यायी मार्ग म्हणून पुष्पमंगल चौक, तनिष्क शोरूम आणि अरणेश्वर बसथांब्याजवळून यू-टर्न घेण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि परिसरातील कोंडी कमी व्हावी, या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा, वाहतूक चिन्हांचे पालन करावे आणि संबंधित मार्गावरील वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार प्रवास करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!