Fake RTO Links & APKs

परिवहन विभागाच्या नावाने सायबर फसवणुकीचा धोका वाढला; बनावट लिंक अन् APKच्या जाळ्यात अडकू नका!!!

सत्यउपासक वृत्त/पुणे: ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलान यांसह परिवहन विभागाशी संबंधित सेवांच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी बनावट संकेतस्थळे, अनधिकृत APK अॅप्स तसेच SMS आणि WhatsAppच्या माध्यमातून खोट्या लिंक पाठविण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळण्याबरोबरच मोबाईलमधील वैयक्तिक व संवेदनशील माहिती चोरण्याचा धोका असल्याने वाहनचालक आणि वाहनमालकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

वाहन नोंदणीसाठी VAHAN, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI, परिवहन सेवांसाठी Parivahan आणि ई-चलानसाठी NextGen eChallan या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. बनावट संकेतस्थळे अधिकृत सरकारी संकेतस्थळांसारखी दिसत असल्याने नागरिकांनी केवळ नाव पाहून अथवा आकर्षक लिंकवर विश्वास न ठेवता संकेतस्थळाचा अधिकृत पत्ता तपासणे आवश्यक आहे.

विशेषतः “दंड त्वरित भरा”, “तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे”, “ई-चलान प्रलंबित आहे” अशा प्रकारचे घाई आणि भीती निर्माण करणारे संदेश पाठवून नागरिकांना लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. अशा संदेशांमधील लिंकवर क्लिक करून बँक खात्याची, कार्डची अथवा अन्य वैयक्तिक माहिती भरल्यास आर्थिक फसवणुकीला आमंत्रण मिळू शकते. RTO कार्यालय किंवा परिवहन विभाग WhatsAppद्वारे पेमेंट लिंक पाठवत नाही, त्यामुळे अशा लिंकपासून नागरिकांनी पूर्णपणे दूर राहावे.

तसेच RTO Services.apk, Parivahan_Update.apk, eChalan Pay.apk यांसारख्या नावांनी पाठविल्या जाणाऱ्या अनधिकृत APK फाइल डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नयेत. अशा फाइलच्या माध्यमातून मोबाईलवरील माहिती, संदेश, संपर्क क्रमांक अथवा अन्य संवेदनशील डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती जाण्याची शक्यता असते.

संशयास्पद लिंकवर क्लिक झाल्यास किंवा आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी अथवा सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. परिवहन विभागाच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांच्या जाळ्यात न अडकता, अधिकृत संकेतस्थळाचा वापर आणि कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी पडताळणी हाच आर्थिक व डिजिटल सुरक्षेचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!