IPL Cricket Cash & Corporate Power

आयपीएल चा बाजार!

मागील वर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता आणि संपूर्ण देश शोक व संतापाने ढवळून निघाला होता. त्यानंतर ७ मेच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील नऊ अतिरेकी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करत या क्रूर कृत्याला ठोस प्रत्युत्तर दिले. देश भावनिकदृष्ट्या अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेने ग्रासलेला असतानाही त्यावेळी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मात्र निर्विघ्नपणे सुरूच राहिली, यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, देशातील शहीद जवान, त्यांचं बलिदान, सामान्य नागरिकांचा जीव, देशभक्तीच्या भावना यांचा या भव्य “बिझनेस टूर्नामेंट” ला काहीही संबंध राहिलेला नाही. प्रचंड अर्थकारण, आक्रमक जाहिरातबाजी आणि मोठ्या ब्रँड्सच्या बाजारपेठेत आयपीएल हा खेळ राहिलेला नसून केवळ एक ‘प्रॉडक्ट’ बनला असून राष्ट्रभावना आणि खेळाडू वृत्ती यांना मागे टाकत आपण केवळ मनोरंजन आणि पैशाच्या मोहाच्या जुगारात अधिकाधिक अडकत चाललो असल्याचेच वास्तव दिसून येते.

आयपीएल चा इतिहास!

भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्ड चे सदस्य ललित मोदी यांनी इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात केली. २००८ साली आयपीएलची पहिली टूर्नामेंट भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्डाच्या अधिपत्याखाली पार पडली सुरुवातीला टूर्नामेंट मध्ये आठ टीम होत्या, यानंतर ललित मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले त्यापासून ते आजतागायत ललित मोदी भारतातून फरार घोषित आहेत. तसेच साल २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमच्या सदस्य खेळाडू आणि मालकांवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले आणि १४ जून २०१५ ला या दोन्ही टीमचे निलंबन करण्यात आले, या घटनेतून टूर्नामेंटमध्ये खेळा दरम्यान मालकांचा हस्तक्षेप होत असून पैसे कमावण्यासाठी खेळाडूंना निरनिराळी प्रलोभने आणि अमिषे दिली जातात हेच निष्पन्न झाले.

आयपीएल चा बाजार!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या अंतर्गत इंडियन प्रीमियर लीग राबवण्यात येत असून सुरुवातीला टीमचे नाव आणि टीम मधील खेळाडू यांची लिलावाद्वारे उद्योगपतीकडून खरेदी होते. या आर्थिक व्यवहारातील रक्कम भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि खरेदी केलेले खेळाडू यांना वितरित होते. २००८ मध्ये आयपीएलच्या सर्व आठ टीम मिळून ३००० कोटीला विकल्या गेल्या आणि मागील वर्षी केवळ एक टीम ७००० कोटीला विकली गेली, यासोबतच डिजिटल आणि टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क एकूण ४८३९० कोटी रुपयाला साल २०२३ ते २०२७ या पाच वर्षासाठी विकले गेले असून, ही सर्व रक्कम टीमच्या मालकांमध्ये वितरित केली जाते, यातील डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क हे मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या वायकॉम १८ या कंपनीने २३७५८ कोटी रुपयांमध्ये घेतले, तर टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने २३५७५ करोड रुपयांमध्ये घेतले. यांची कमाई वाहिनीवर अथवा डिजिटल पोर्टलवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच मॅच बघण्यासाठी येणाऱ्या दर्शकांची संख्या अर्थातच व्ह्यूवरशिप आणि वाहिनीची महिन्याची फी तसेच मॅच बघण्यासाठी वापरण्यात येणारा इंटरनेट डाटा यामधून मोठया प्रमाणात होते.

आयपीएल चा तोटा!

आयपीएल सारख्या टूर्नामेंट्समध्ये खेळ भावना न राहता पैशांचा खेळ ( जुगाराचा अड्डा ) झाला आहे, क्रिकेट बाजूला राहून ड्रीम इलेव्हन, माय टीम इलेव्हन, एम पी एल प्रो, गेमझी, माय इलेव्हन सर्कल, फॅनफाईट, पेटीएम फर्स्ट गेम्स अशा ॲप्स च्या माध्यमातून आपली टीम बनवण्यासाठी आणि त्याच्यावरती पैसे लावण्यासाठी युवकांना मोठमोठे खेळाडू प्रवृत्त करत आहेत, आणि तरुणाई या भूलथापांवर विश्वास ठेवून घरच्यांचा अथवा स्व कमाईचा कष्टाचा पैसा केवळ कलाकार आणि स्टार्स यांच्या प्रलोभनांना भुलून अशा गॅम्बलिंग मध्ये लावताना दिसून येत आहे, कालांतराने अर्थातच याचे व्यसन जडून प्रसंगी मोठ्या प्रमाणात युवकांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे. दोन महिन्याच्या आयपीएल सारख्या टूर्नामेंट मधून दर्शक सोडले तर आयपीएल मध्ये दृश्य-अदृश्य स्वरूपात सहभागी असणारे सर्वचजण दोन महिन्यातच लाखो करोडोंची कमाई करत असून युवकांचे मात्र वेळेसोबत आर्थिक नुकसान होत राहते.

आयपीएलमुळे खेळाचा बदललेला दृष्टिकोन!

आयपीएल सारख्या टूर्नामेंट मुळे खिळाडू वृत्तीचा ऱ्हास आणि पैशाचा खेळ उदयास आला, असे म्हणावे लागेल. भविष्यात मॅच फिक्सिंग होऊन प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट, प्रत्येक खेळाडू पैशाने विकला जाऊ शकतो यावर लोकांचा विश्वास बसला असून, क्रिकेट हा खेळ धनाड्य उद्योगपतींच्या दावणीला बांधला गेला आहे असे निदर्शनास येत आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर आयपीएल मधील प्रत्येक होणारी मॅच ही टीम विरुद्ध टीम नसून इंडिया विरुद्ध भारत अशीच आहे, असे कायम जाणवते. यातून ठराविक लोकांचीच चंगळ होत असून सामान्यांच्या नशिबी मंगळ राहणार याची खात्री वाटते, तसेच यामध्ये खेळ सोडून ब्रँडिंग, स्पॉन्सरशिप, जुगार, या व्यतिरिक्त उच्चभ्रू लोकांसाठी करमनुकीच्या सर्व सोयी सुविधा मैदानामध्येच उपलब्ध होत असल्यामुळे कित्येक वेळेस कलाकार स्टार्स मंडळी मैदानामध्येच मद्यपान, आणि धूम्रपान करताना निदर्शनास येत असून आता मैदानांचा वापर खेळाव्यतिरिक्त पार्ट्यांसाठी सुद्धा होत असून शासनाने स्टेडियम च्या आवारात पंचतारांकित हॉटेल करता परवानगी दिली आहे.

आयपीएल: खेळाडूंच्या करिअरचा टर्निंग पॉईंट की ट्रेडिंग प्लॅटफॉर्म?

आयपीएलचा वापर हा दुधारी तलवारी सारखा असून खेळाडूंनी स्वतःचा खेळ आणि उद्योग जगतातील झगमगाट यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. एकदा आयपीएल मध्ये टीम ची खरेदी झाली, की पाच वर्षांपर्यंत खेळाडूंचे हक्क टीमच्या मालकांकडे राहतात, यामुळे टीमला प्रायोजक ( स्पॉन्सर ) करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती खेळाडूंना कराव्या लागतात, आयपीएल मध्ये प्रत्येक टीम मध्ये चार विदेशी खेळाडू असून बाकीचे खेळाडू भारतीय असने हे बंधनकारक आहे, यामुळे नवीन युवा क्रिकेटपटूंना पैशासोबतच विदेशी खेळाडू आणि भारतीय टीम मधील वरिष्ठ खेळाडू यांच्यासोबत एकत्र खेळण्याची संधी उपलब्ध होते. यामुळे अर्थातच त्यांना आपला खेळ अधिक सक्षम करण्यासाठी या खेळाडूंचे मार्गदर्शन लाभते, अर्थातच या फायद्यांबरोबर या खेळाडूंना काही तोटेही होतात जसे आयपीएल हा २० षटकांचा खेळ असल्यामुळे त्यांना फलंदाजी अथवा गोलंदाजी यामध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी म्हणावा तेवढा कालावधी मिळत नाही. जुगाराप्रमाणेच एखाद्याचे नशीब चमकले तर तो युवा खेळाडू प्रकाश झोतात येतो आणि रातोरात स्टार सुद्धा होतो आणि प्रकाश झोतामध्ये आल्यामुळे उच्चभ्रु आणि फिल्म जगताच्या नादी लागून स्वतःला श्रेष्ठ समजून नवीन शिकण्याची वृत्ती गमावून बसतो, म्हणून अशा खेळाडूंचे करिअर हे दोन ते तीन आयपीएल खेळण्यापूरतेच मर्यादित राहते. परंतु अशा खेळाडूंपेक्षाही चांगले खेळत असलेले काही खेळाडू केवळ त्यांना संधी न मिळाल्यामुळे अथवा स्वतःची क्षमता त्यावेळेस न दाखवता आल्या कारणाने मानसिक दृष्ट्या खचून जातात. यामुळे युवाक्रिकेटपटूंनी उद्योगजगत आणि फिल्मजगतातील प्रसिद्धी, राहणीमान, झगमगाट, जाहिरात बाजी, चकाचोंध लाइफस्टाइल यांच्या आहारी न जाता, पैसा हा सर्वस्व न मानता आपल्या खेळाचा सर्वांगीण विकास करणे याला महत्व दिले पाहिजे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास, आयपीएल ही खेळापेक्षा ‘बिझनेस’ बनलेली एक भव्य बाजारपेठ बनली असून, युवकांना प्रेरणा देण्याऐवजी त्यांना जुगाराच्या गर्तेकडे ढकलत असल्याचेच चित्र दिसून येत आहे, राष्ट्रीय भावना, क्रीडासंस्कार आणि सामाजिक जबाबदारी यापेक्षा व्यवसायिक लाभाला प्राधान्य देणारी ही स्पर्धा देशाच्या सांस्कृतिक आणि क्रीडा मूल्यांवर गडद सावली टाकत असून युवाशक्तीने हे भान ठेवले पाहिजे की पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. ‘खेळ’ म्हणजे ‘संस्कार’ हे जपणं हेच आजच्या घडीला अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!