चिया पिकातून समृद्धीकडे वाटचाल; वाशिम जिल्ह्याचा प्रेरणादायी प्रवास

नावीन्यपूर्ण शेतीची यशोगाथा; वाशिम जिल्ह्यातील ‘चिया क्रांती’

भारताचा आर्थिक कणा असलेली शेती सध्या वाढता उत्पादन खर्च, अविश्वसनीय हवामान बदल आणि रसायनाधिष्ठित शेतीच्या दुष्परिणामांमुळे संकटात आहे. पारंपरिक शेतीमध्ये वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे आजचा जागरूक शेतकरी सतत नवीन पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांमध्ये चिया बियांची (Chia Seed) लागवड एक आशादायक पर्याय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर चिया सीड या औषधी पिकाने शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण केला असून वाशिम जिल्ह्याने यशस्वी प्रयोग करून राज्यासाठी एक नवा आदर्श घडवला आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी पिकांकडे वळण्याचा नवा प्रवाह निर्माण झाला आहे. “रसायनमुक्त शेतीकडे एक पाऊल म्हणून चिया पीक आणि वाशिमचा प्रयोग” अशी नवी दृष्टी आजच्या कृषी धोरणात दिसून येत आहे.

वाशिम जिल्हा, जो एकेकाळी महाराष्ट्रातील आकांक्षित जिल्ह्यांपैकी गणला जात होता, आज शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात चिया शेतीमुळे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. “शेतीतील परिवर्तनाचा नवा मंत्र म्हणून राज्याला आदर्श ठरावे असे चिया शेतीचे वाशिम मॉडेल” या शब्दांत या बदलाचे सार सांगता येईल.

चिया सीड वैशिष्ट्ये आणि आरोग्यदायी उपयोग:

चिया, शास्त्रीय भाषेत Salvia hispanica L. म्हणून ओळखले जाते, मूळतः ग्वाटेमाला आणि मध्य अमेरिका या भागांतील भूमध्यरेषीय हवामानात विकसित झालेले पीक आहे. चिया बियाण्याचे उत्पादन हे भौगोलिक प्रदेश, जाती आणि लागवडीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ अर्जेंटिना आणि कोलंबियामध्ये व्यावसायिक पातळीवर उत्पादन ४५० ते १२५० किलो प्रति हेक्टर दरम्यान असते, तर इक्वेडोरच्या आंतर-अँडियन खोऱ्यात केलेल्या छोट्या अभ्यासात २३०० किलो प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन नोंदवले गेले आहे. त्यामुळे योग्य हवामान आणि जातीचा परस्परसंवाद उत्पादन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शिवाय, जीनोटाइपचा प्रभाव प्रथिने, तेल व फॅटी ऍसिड रचनेवर होणाऱ्या परिणामांपेक्षा उत्पादनावर अधिक ठरतो. वाढत्या तापमानामुळे तेलाचे प्रमाण आणि असंतृप्ततेची पातळी कमी होते, मात्र प्रथिने प्रमाण वाढते, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. चिया बिया लहान, चपट्या आणि अंडाकृती असून त्यांचा आकार सरासरी २.१ मिमी × १.३ मिमी × ०.८ मिमी इतका असतो. प्रत्येक बियाण्याचे वजन साधारणतः १.३ मिलीग्राम असते. रंगाने या बिया तपकिरी, राखाडी, काळ्या आणि पांढऱ्या अशा विविध छटांमध्ये आढळतात. चिया बियांमध्ये एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जलशोषण क्षमता; भिजवल्यावर त्या त्यांच्या वजनाच्या १२ पट पाणी शोषून घेतात आणि एक म्यूसिलॅजिनस जेल थर तयार करतात, जो आहारात फायबर आणि जलधारणेसाठी उपयोगी पडतो. चिया बियामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असून त्याचा उपयोग आरोग्यदायी आहारात, वजन नियंत्रणात व ताकद वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आजच्या तरुणाईपासून ते आहारतज्ज्ञांपर्यंत चिया सीडला मोठी मागणी आहे.

भारतात चिया पीक लागवडीची सुरुवात सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI), बेंगळुरू यांनी कर्नाटकात प्रायोगिक तत्त्वावर केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशातही या पिकाचा विस्तार झाला, याचा आदर्श घेत चियाची बीजरोपणाची कल्पना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमात मांडली आणि कृषी विभागाच्या समन्वयाने प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी ती प्रत्यक्षात उतरवली, केवळ ११० दिवसांत उत्पादन देणारे, कमी पाण्यावर वाढणारे, कीड प्रतिरोधक आणि सेंद्रिय दृष्टिकोनातून फायदेशीर असलेले हे पीक वाशिमच्या हवामानास योग्य ठरले.

२०२२-२३ मध्ये १६२ हेक्टरवर सुरू झालेली चिया लागवड २०२४-२५ मध्ये ३६०८ हेक्टरवर पोहोचली – म्हणजे अवघ्या दोन वर्षांत २२ पट वाढ. आज चिया हे हरभरा आणि गहू यानंतर वाशिमचे तिसरे सर्वात मोठे रब्बी पीक ठरले आहे. यामुळे वाशिम जिल्हा भारतातील चिया उत्पादनात आघाडीवर आहे.

कमी खर्च, जास्त नफा; चिया शेतीने दिली नवी दिशा!

परंपरागत पिकांच्या तुलनेत चिया सीडचे उत्पादन आणि लागवडीचा खर्च फारच कमी म्हणजे एका एकरासाठी फक्त ५ किलो बियाणे येवढाच येतो; विशेष बाब म्हणजे या पिकाला सिंचनासाठी अत्यल्प पाणी , फारच थोड्या प्रमाणात खते, आणि मुळात जंगली पीक असल्याने कोणत्याही कीटकनाशकाची गरज नसून पेरणी हाताने फवारणी पद्धतीने होते, त्यामुळे ट्रॅक्टरचा खर्चही वाचतो!

बाजारपेठेच्या अडचणींवर मात करत आत्मा व कृषी विभागाच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातच खरेदीदार-विक्रेते मेळावे, सेंद्रिय प्रमाणन प्रक्रिया व कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्यांची सुरुवात झाली. परिणामी, शेतकऱ्यांना चियाला प्रति क्विंटल १४,००० ते २३,००० रुपये दर मिळाला.या चिया क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले. एका रुपयामागे ४.८१ रुपये नफा मिळवणारे हे पीक, गहू आणि हरभऱ्याच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लाभदायक ठरले. शेतकऱ्यांनी शेती उपकरणांमध्ये गुंतवणूक केली, क्षेत्र विस्तारले आणि शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली.

या यशासाठी वाशिम जिल्ह्याला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला, जो जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची पावती आहे.

आता चिया उत्पादनाच्या पुढच्या टप्प्यात, मूल्यवर्धित उत्पादने जसे की ‘न्युट्रिशन बार’ व आरोग्यपूरक चिया-आधारित खाद्यपदार्थ तयार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.

एकंदरीत, चिया सीड शेती हा वाशिम जिल्ह्यासाठी केवळ एक शेतीतील प्रयोग नव्हता, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेचा आणि पर्यावरणीय शाश्वततेचा एक ठोस मार्ग होता. कमी पाणी, कमी रसायनांचा वापर, कमी उत्पादन खर्च आणि चांगले बाजारमूल्य या सगळ्यांचा समन्वय साधत वाशिम जिल्ह्याने संपूर्ण राज्यासाठी आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी चिया सीडसारख्या पिकांचा स्वीकार केल्यास शेतीतील संकटांना सामोरे जात नवीन संधींचा नवा अध्याय लिहिता येईल, याकरिता वाशिमची ‘चिया क्रांती’ हे एक आदर्श उदाहरण ठरते जिथे दूरदृष्टी, नवकल्पना आणि शेतकरी-केंद्रित धोरणांनी शेती शाश्वत आणि फायदेशीर बनवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!