Agri Hackathon 2026

पुणे ॲग्री हॅकॅथॉन च्या दुसऱ्या पर्वाला उद्यापासून सुरुवात…

देशभरातील स्पर्धकांचा सहभाग; १२० नवतंत्रज्ञानाचे प्रदर्शन; एआय, रोबोटिक्स आणि स्मार्ट शेतीच्या कल्पनांचा संगम!

सत्यउपासक/ पुणे: कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला उद्या, १५ मेपासून प्रारंभ होत असून ही स्पर्धा १७ मेपर्यंत कृषी महाविद्यालय, पुणे येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून समारोप व बक्षीस वितरण समारंभ १७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

स्पर्धेत एआय, रोबोटिक्स आणि स्मार्ट शेतीच्या कल्पनांचा संगम…

स्पर्धेत मृदा आरोग्य व व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, एआय व रोबोटिक्स आधारित शेती यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा व कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, आपत्ती व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप तसेच पीक नुकसानीचे मूल्यांकन व भाकितासाठी एआय आधारित साधने अशा विविध विषयांवरील नवकल्पना आणि उत्पादने सादर करण्यात येणार आहेत.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित १२० नवकल्पनांचे प्रदर्शन

स्पर्धेसाठी देशभरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून यावर्षी एकूण १ हजार २९० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६७ अर्ज आले असून तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्लीसह विविध राज्यांमधूनही सहभाग नोंदविण्यात आला आहे. प्राप्त अर्जांची प्राथमिक छाननी ज्युरी पॅनेलमार्फत करण्यात आली असून त्यातून १२० नवकल्पनांची प्रत्यक्ष प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे, स्पर्धेतील प्रत्येक प्रवर्गातून विजेता आणि उपविजेता निवडण्यात येणार असून विजेत्यास २५ लाख रुपये तर उपविजेत्यास १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

नवकल्पनांपासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत; ॲग्री हॅकॅथॉनची यशोगाथा

मागील वर्षीच्या स्पर्धेत निवडलेल्या १६ नवकल्पनांपैकी १२ उत्पादनांना कृषी विद्यापीठाकडून प्रमाणिकरण मिळाले असून त्यातील चार उत्पादनांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू झाले आहे. उर्वरित उत्पादनांच्या विकसनाची प्रक्रिया सुरू असून काही उत्पादनांचा शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधन आणि नवतंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही देशभरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या व्यासपीठातून अनेक नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनाधारित उत्पादने आणि कृषी क्षेत्राला दिशा देणाऱ्या नवतंत्रज्ञानाला नवे द्वार खुले होणार असल्याचा विश्वास  कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!