CM Felicitates Agri Hackathon Winners

पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ पुढील वर्षापासून राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

सत्यउपासक/ पुणे: शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल तसेच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालय येथे आयोजित दुसऱ्या ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा-२०२६’च्या समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष योगदान आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी तब्बल १ हजार २९० अर्ज प्राप्त झाले असून विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील चार संशोधन प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात सुरू झाले असून आणखी १२ उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.

“या स्पर्धेतून केवळ कल्पना मांडल्या जात नाहीत, तर त्या प्रत्यक्ष उत्पादनात उतरून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता निर्माण होते. यंदाच्या स्पर्धेतील १८ निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येणार असून त्यापैकी किमान १२ प्रकल्प बाजारात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रदर्शनात शेतीतील तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत विविध उपयुक्त नवकल्पना सादर करण्यात आल्या. उपग्रह नकाशांकन आणि मृदा परीक्षणाच्या आधारे जमिनीचे अचूक विश्लेषण करणारे नमुने, शेताच्या रचनेनुसार ओलावा व्यवस्थापन करून आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तसेच तण आणि पीक ओळखून स्वतंत्र फवारणी करणारे तंत्रज्ञान अशा विविध संकल्पनांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असून भविष्यात त्याची अचूकता आणखी वाढेल, असे सांगताना त्यांनी पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मानवरहित यंत्रे आणि उपग्रह नकाशांकनाच्या माध्यमातून अचूक अहवाल तयार करणारे तंत्रही उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले की, बदलते हवामान, पाण्याची कमतरता, खतांची टंचाई, मजुरांची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार या विविध आव्हानांना सामोरे जाताना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून प्रदर्शनाची पाहणी; नवकल्पनांचे कौतुक

‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर थांबून त्यांनी संशोधक आणि युवा उद्योजकांशी थेट संवाद साधत त्यांच्या संकल्पना समजून घेतल्या तसेच त्यांच्या संशोधनाचे कौतुक करत प्रोत्साहन दिले.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना, स्मार्ट सिंचन प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, स्वयंचलित उपकरणे तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध संशोधनात्मक प्रकल्पांविषयी त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. प्रकल्प सादर करणाऱ्या तरुणांच्या कल्पकतेचे कौतुक करत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी विविध उपकरणांची कार्यपद्धती समजून घेत त्यांनी संशोधकांना प्रोत्साहनपर प्रश्न विचारले. अशा उपक्रमांमधून राज्यातील युवकांना नवसंशोधनासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!