CM Inaugurates Pune city Projects

पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

पुणे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

सत्यउपासक/पुणे: पुणे शहराला देशातील सर्वात आधुनिक आणि “ग्लोबल कॅपिटल सेंटर” म्हणून विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकार वेगाने काम करत असल्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना सांगितले.

 पुणे शहराला देशातील ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून मिळालेली ओळख पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरात हाती घेतलेले प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षात पूर्ण झाल्यानंतर देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

मोहम्मदवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याच्या साठवण टाक्यांचे लोकार्पण तसेच मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो समवेत दुमजली उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजननिमित्त रहेजा चौक, दोराबजी मॉल जवळ, मोहम्मद वाडी हडपसर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते.

पुण्याचा नवीन विमानतळ, नवीन रिंग रोड, हडपसर पासून यवतपर्यंत आधुनिक प्रकारचा उन्नत मार्ग आदी सर्व माध्यमातून पुण्याची जोडणी चांगली करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गतवर्षी एकट्या पुण्यात देशातील २५ टक्के जीसीसी तयार झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानंतर पुढील लाट जीसीसीची असून त्यात पुणे पुढे चालले आहे. ते पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. महात्मा फुले चौक ते खराडी हा मेट्रोसह दुमजली पूल उभारण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासह प्रवासातील १५ ते २० वाचणार आहेत. पुण्याला गतिमान करण्याच्या प्रयत्नातील हा एक महत्वाचा पूल आहे. कोंढवा परिसरातील रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे येत्या ६ महिन्यात भूसंपादन होऊन हा रस्ता पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

राज्यात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा प्रयत्न

देशातील पहिले पीपीपी तत्वावर दर्जेदार आरोग्य सेवा उभी करता येते हे या कर्करोग उपचार रुग्णालयाच्या उभारणीवरून दिसून येते. राज्यात मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड तयार करण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न सुरू आहे. या ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला कॅन्सरवरील आधुनिक उपचार वेळेत आणि अत्यल्प दरात वा मोफत मिळाला पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

या रुग्णालयात अतिशय आधुनिक अशा गामा स्कॅन, पेट स्कॅन आदींसह उपचार सुविधा सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या सीजीएचएस योजनेप्रमाणे अतिशय अल्प दरात मिळणार आहेत. शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी मिळणार आहेत. कॅन्सर सारखा आजार वेगाने वाढत असताना त्याचे उपचार प्रदीर्घ व खर्चिक होतात. हे पाहता पुणेकरांसाठी हे रुग्णालय एक वरदान ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण…

 छत्रपती संभाजी महाराज हे बुधभूषण ग्रंथ लिहित आहेत अशा स्वरूपाचे शिल्प छत्रपती संभाजी उद्यान येथे उभारले असून या शिल्पाच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, ११ भाषा ज्ञात असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना आहे. या ग्रंथातील १० श्लोकांचा शिल्पात समावेश केला असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व त्यातून समजण्यास मदत होते. यावेळी ‘पुणे प्रथम’ या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प स्वराष्ट्राचा अभिमान जागृत करण्याची प्रेरणा देईल- उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, शासन आणि खासगी क्षेत्र एकत्र आल्यानंतर जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात हे कर्करोग रुग्णालय हे उदाहरण आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथ लिहितानाचे शिल्प केवळ पाहण्यासाठी नाही त्यांच्यासारखा कणखर बाणा आणि स्वराष्ट्राचा अभिमान सर्वांमध्ये जागृत करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत आज लोकार्पण झालेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे दोराबजी पॅराडाईज, महंमदवाडी, एनआयबीएम या सर्व भागात समान पाणी पोहोचणार आहे. २०१५ साली पुण्यात वितरण व्यवस्था चांगली झाली पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला. पुण्यात देशात सर्वाधिक पाणी वापर दिसत होता. त्याचे कारण ४० ते ५० टक्के पाण्याची गळती होत होती. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना राबवून वितरण व्यवस्था अधिक चांगली करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाण्याचा नाश टाळून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता यासाठी २०१७ साली या योजनेला मान्यता दिली. येथील लोकप्रतिनिधींनीही सतत पाठपुरावा केला. ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

लोकांना पाणी मिळाले तर जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा मोठे आशीर्वाद कुठलेही नाहीत. उरलेले काम पूर्ण व्हावे यासाठी २ महिन्यात आढावा बैठक घेऊन गती देण्यात येईल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पुणेकराला ‘रोज पाणी, शाश्वत पाणी, शुद्ध पाणी, सातत्यपूर्ण पाणी’ देऊ शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वाढलेली लोकसंख्या, नवीन समाविष्ट झालेल्या गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी १२ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठी ८९० कोटी रुपये दिले. तसेच केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड मधूनही निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून खडकवासला, नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी, जांभूळवाडी, भिलारवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या नऊ टाक्यामुळे येथील जनतेला पुरेशा दाबाने पाणी मिळेल. पाणी हे जीवन असून पाण्याची बचत करणे महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. मेट्रोच्या पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचत होणार आहे. कामांच्या गुणवत्तेबरोबरच, भविष्यातील विचार करून नियोजन करण्यावर स्व.अजित पवार यांचा भर होता. त्यांच्या भूमिकेनुसार विकास कामे करण्यावर भर दिला जाईल.

प्रास्ताविकात महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या धर्तीवर ‘विकसित पुणे’ या संकल्पनेनुसार पुणे शहराला सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी काम सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे ३ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार आहे. पुणेकरांच्या वाहतुकीला गती आणि वाहतुकीला अत्याधुनिक रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खराडी ते महात्मा फुले चौकदरम्यान मेट्रोसह दुमजली पुलामुळे खराडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आमदार योगेश टिळेकर म्हणाले, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी २०१५ मध्ये २ हजार ८०० कोटी रुपयांची समान पाणीपुरवठा योजना जाहीर करून आता कार्यान्वित केली. म्युनिसिपल बाँड च्या माध्यमातून निधी उभा केला. पुणे आणि हडपसरच्या रस्ते, पाणीपुरवठा, विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची उपलब्ध करून दिला आहे.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या असून माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि आधुनिक नागरी सुविधांच्या माध्यमातून पुणे शहर देशातील अग्रगण्य आधुनिक शहर म्हणून पुढे येईल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला सोबतच विकासाच्या या नव्या पर्वामुळे पुण्याची ओळख केवळ सांस्कृतिक राजधानीपुरती मर्यादित न राहता आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून निर्माण होईल, अशी अपेक्षा पुणेकरांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!