जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे वृक्षारोपण; हरित पुण्याचा दिला संदेश!
सत्यउपासक वृत्त/ पुणे: पुणे शहरातील वाढते तापमान, वायुप्रदूषण आणि ढासळता पर्यावरणीय समतोल या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते जंगली महाराज रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील छत्रपती संभाजीराजे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. बुधवारी (दि. १८) दुपारी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी जॅकी श्रॉफ यांनी पुणे शहरातील वाढते तापमान आणि वायुप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. अपरिहार्य कारणास्तव एखादे झाड तोडण्याची वेळ आली, तरी त्याबदल्यात जास्तीत जास्त नवीन वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करणे तितकेच आवश्यक आहे. केवळ वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण संवर्धन साध्य होणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे झाडात रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. विशेषतः लहान मुलांसह भावी पिढीला सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरण मिळावे, यासाठी नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, सह महापालिका आयुक्त तथा उद्यान विभागप्रमुख डॉ. अशोक दि. घोरपडे, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पुणे शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे संरक्षण, वृक्षांची संख्या वाढविणे आणि अस्तित्वातील वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरात वृक्षारोपणाच्या उपक्रमांबरोबरच लावलेल्या वृक्षांचे प्रत्यक्ष संगोपन, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सेलिब्रिटींच्या सहभागातून पर्यावरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचणे निश्चितच स्वागतार्ह असले, तरी त्या संदेशाचे रूपांतर नागरिकांच्या कृतीत आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कामकाजात होणे अधिक महत्त्वाचे आहे. हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वृक्षलागवडीइतकेच वृक्ष जगविण्याचे उत्तरदायित्वही सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे.