शाळांसमोर मृत्यूचे सापळे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?
झेब्रा क्रॉसिंग नाही, स्पीड ब्रेकर नाही; स्कूल झोन फलकांचा अभाव; विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो रस्ता पार!
सत्यउपासक विशेष वृत्त: शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दररोज हजारो विद्यार्थी शाळेत ये-जा करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे वास्तव सत्यउपासक वृत्त समूहाच्या तपासात समोर आले आहे.
शहरातील अनेक नामांकित शाळा मुख्य गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांलगत तसेच राज्य महामार्ग किंवा थेट राष्ट्रीय महामार्गालगत असून ‘सत्यउपासक वृत्त समूहा’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या शाळांसमोर सुरक्षिततेचा पुरता बोजवारा उडाला असून विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कित्येक ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी कुठेही झेब्रा क्रॉसिंग नाही, वाहनांचा बेफाम वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक स्पीड ब्रेकर नाहीत, तर अनेक ठिकाणी पुढे शाळा असल्याचे दर्शविणारे साधे इशारा फलकही प्रशासनाने लावलेले नाहीत. प्रशासकीय अनास्थेच्या या भीषण पराकोटीमुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव अक्षरशः मुठीत धरून धोकादायक पद्धतीने रस्ते ओलांडावे लागत आहेत.
विशेष म्हणजे अनेक शाळांच्या बसेस आणि रिक्षाचालक शाळेबाहेरच मुख्य रस्त्यावरच थांबून विद्यार्थ्यांना चढवत आणि उतरवत असल्याचे ‘सत्यउपासक वृत्त समूहा’च्या पाहणीत समोर आले असल्यामुळे एका बाजूला वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी भरधाव वेगाने वाहने धावत असतानाच ही लहान मुले जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसतात, मात्र तिथे शाळा व्यवस्थापकांकडून कोणतीही सक्षम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याबद्दल स्थानिक पालकांकडून तीव्र संताप व खंत व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थी सुरक्षेच्या या अत्यंत संवेदनशील विषयाला अनेक शाळा प्रशासनांकडूनही पुरेशी प्राथमिकता दिली जात नसल्याचे विदारक चित्र आहे; शाळा परिसरातील वाहतुकीचे ढिसाळ नियोजन, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवेश व निर्गमनाची नसलेली ठोस व्यवस्था आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता यावरून शाळा व्यवस्थापनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे.
यासोबतच पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित शालेय प्रशासकीय यंत्रणांकडून शाळा परिसरातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत आवश्यक ती तत्परता आणि उपाययोजना दिसून येत नसून एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजनांची घोषणा करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आगाऊ नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ शाळांची किंवा पालकांची जबाबदारी नसून प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित सर्व विभागांची सामूहिक जबाबदारी असून एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या असुरक्षित प्रवासाची ‘सत्यउपासक वृत्त समूहा’ने उघडकीस आणलेली वास्तव स्थिती पाहता, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या परिसरातील विद्यार्थी सुरक्षा व्यवस्थेचे विशेष सर्वेक्षण होणे आवश्यक असून, प्रत्येक शाळेसमोर गरजेनुसार स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग आणि ‘स्कूल झोन’चे सांकेतिक फलक तातडीने बसवणे गरजेचे आहे.
विशेषतः व्यस्त रस्ते व महामार्गालगतच्या शाळांची स्वतंत्र सुरक्षा तपासणी करून प्रशासनाने शाळांना रस्ता सुरक्षेबाबत कडक निर्देश द्यावेत. तसेच शाळांच्या बस व रिक्षांसाठी स्वतंत्र सुरक्षित थांबे निश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका, शालेय प्रशासन आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधून या उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास भयमुक्त करता येईल.