सामायिक सातबारांमुळे हजारो शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित?
पुणे: राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी नोंदणी सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः सामायिक क्षेत्र असलेले किंवा अद्याप खातेफोड न झालेल्या गट क्रमांकांमध्ये केवळ एका व्यक्तीलाच फार्मर आयडी मिळत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे अनेक पात्र शेतकरी नोंदणीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी एकाच सातबारावर दोन, तीन किंवा त्याहून अधिक भावांची नावे नोंद असतात. त्यापैकी एखाद्या भावाने स्वतःच्या हिस्स्याचे क्षेत्र विक्री केल्यानंतर विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव सातबारावर नोंदवले जाते. मात्र संबंधित जमीन अद्याप सामायिक क्षेत्रात असल्याने अथवा अधिकृत खातेफोड प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नव्या धारकाला स्वतंत्रपणे फार्मर आयडी जनरेट करता येत नसल्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून काही ठिकाणी संपूर्ण गटातून केवळ एका व्यक्तीचाच फार्मर आयडी मंजूर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोकणासह काही भागांमध्ये एका सातबारावर मोठ्या प्रमाणात खातेदारांची नावे असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे चित्र आहे. वारस नोंदी, सामायिक मालकी आणि खातेफोड प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अनेक पात्र शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित राहत आहेत.
फार्मर आयडी मंजुरीची प्रक्रिया महसूल विभागाकडे असून जमीनीच्या नोंदींशी संलग्न असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये नेमकी तांत्रिक अथवा महसुली अडचण काय आहे, याची शहानिशा कृषी विभागाने करून सामायिक सातबारा, वारस नोंदी, खातेफोड प्रकरणे आणि बहुखातेदार जमीनधारकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर करून सर्व पात्र खातेदारांना स्वतंत्र फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोणती उपाययोजना करणार आहे, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी.