सातारा, दि. ६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या पथकाने आज कोरेगाव येथे धडक कारवाई करत गॅस एजन्सीवरील कारवाई टाळण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि त्याच्या सांगण्यावरून लाच घेणाऱ्या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची कोरेगाव येथे भारत गॅस एजन्सी असून सध्याच्या परिस्थितीत ते शासनाच्या नियमानुसार ग्राहकांना गॅस सिलेंडरचे वितरण करीत होते. दरम्यान, तहसील कार्यालय कोरेगाव येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे यांनी एजन्सीच्या गोडाऊनची वारंवार तपासणी न करण्यासाठी तसेच एजन्सीविरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाई टाळण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच मागितली होती. कारवाईच्या भीतीने तक्रारदारांनी ३१ मार्च २०२६ रोजी २५ हजार रुपये दिले होते.
मात्र उर्वरित रकमेची मागणी सुरूच असल्याने तक्रारदारांनी १ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी आनंद शिंदे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ६ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी शिंदे यांच्या सांगण्यावरून अवधुत दिलीप कालेकर (वय ३६, रा. कोरेगाव) यांनी जनसेवा सहकारी बँक, कोरेगाव शाखेच्या आवारात पंचासमक्ष १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे तसेच चालक पोलीस हवालदार महेश पुजारी यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक आणि अर्जुन भोसले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र) यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे करीत असून, ही माहिती पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी दिली आहे.