Maharashtra’s Drought Impact

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची आजपासून केंद्रीय पथकाकडून पाहणी!!!

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रभेटी; ११ सदस्यीय पथक तीन गटांत करणार पाहणी…

सत्यउपासक वृत्त/पुणे: खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक आजपासून, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार पथकाकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अन्य संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांकडून क्षेत्रभेटी घेऊन दुष्काळाची तीव्रता, पिकांवरील परिणाम आणि स्थानिक पातळीवरील परिस्थितीची माहिती घेतली जाणार आहे. या पाहणीदरम्यान केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधून जिल्हानिहाय परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यावर भर राहणार आहे.

तीन पथकांद्वारे विविध भागांची पाहणी!

दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. या ११ सदस्यीय पथकात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग तसेच अन्य संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागातील पीक विमा विषयक संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल करीत आहेत.

पहिले पथक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. दुसरे पथक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. तर तिसरे पथक विदर्भातील नागपूर, यवतमाळ तसेच लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.

या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता, टंचाईची स्थिती तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या इतर अडचणींची माहिती संबंधित जिल्हा प्रशासन आणि राज्य यंत्रणांकडून घेतली जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या क्षेत्रीय पाहणीतून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष चित्र केंद्र सरकारसमोर मांडण्यास मदत होणार आहे. त्यानंतर केंद्राच्या निकषांनुसार पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक मूल्यांकन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!