Fisheries Services Go Digital

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन!

सत्यउपासक वृत्त/पुणे: राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मत्स्यशेतकरी, मच्छिमार आणि मत्स्यव्यवसायिकांसाठी शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मासेमारी परवाना वितरणाची सेवाही पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार असून, अर्जापासून ते अनुदान वितरणापर्यंतची प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पार पडणार आहे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास, मत्स्यव्यवसायिकांचे उत्पन्न वाढविणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांचे एकत्रिकरण करून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेला ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून, त्याअंतर्गत एकूण २८ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाडीबीटी २.० पोर्टलवर या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, मच्छिमारांना मासेमारी परवाना देण्याची सेवाही शासनाने डिजिटल स्वरूपात आणली आहे. शासनाच्या GPR अंतर्गत ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, यासंदर्भात १ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या बदलामुळे परवाना मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच प्रशासकीय कामकाजातील अनावश्यक विलंब आणि कागदपत्रांच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे.

महाडीबीटी २.० पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आधार क्रमांकाच्या आधारे MahaID तयार करून संबंधित योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जदारांनी सादर केलेल्या माहितीची विविध शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून स्वयंचलित पडताळणी केली जाणार असून, मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच संबंधित सेवांची प्रमाणपत्रेही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, लाभार्थ्यांना सुलभ सेवा आणि प्रशासकीय प्रक्रियेत गतिमानता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मत्स्यशेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक तसेच मच्छिमार संस्थांनी महाडीबीटी २.० या अधिकृत पोर्टलवर (https://mahadbt2.maharashtra.gov.in/⁠) आधार क्रमांकाच्या आधारे MahaID तयार करून पात्र योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत आणि शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविताना लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी पुणे विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालये तसेच प्रादेशिक कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. MahaID तयार करणे, ऑनलाइन अर्ज भरणे किंवा पोर्टलवरील प्रक्रियेसंदर्भात अडचणी उद्भवल्यास संबंधित जिल्ह्यातील सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे. यासाठी ८३२९९६४७९७ या मोबाईल क्रमांकावर किंवा rdcfpune.cmmsy@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे.

पारदर्शक अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची स्वयंचलित पडताळणी, थेट बँक खात्यात अनुदान वितरण आणि ऑनलाइन प्रमाणपत्रे यामुळे लाभार्थ्यांचा वेळ, श्रम आणि प्रशासकीय फेऱ्या वाचण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मत्स्यशेतकरी, पारंपरिक मच्छिमार आणि लघु मत्स्यव्यवसायिकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सहजतेने उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला, रोजगारनिर्मितीला आणि व्यवसायवृद्धीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर आणि विभागाच्या सहाय्यता कक्षांचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीला नवी गती देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!