Fake ads Stars, Brands & Misleading Claims

जाहिरात की फसवणुकीचे हत्यार!

चमक सेलिब्रिटींची, फसवणूक ग्राहकांची; खोट्या दाव्यांची झगमगाटी दुनिया; जाहिरातींचा बाजार!!!

सत्यउपासक विशेष: अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली १६ ऑगस्ट २०२६ रोजी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या आधी सुद्धा अशा नोटीसा वारंवार बजावण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जाहिरातींमधून खोटे उपचार, हमी, उपचाराने रोग पूर्ण बरा होतो असे दावे, तसेच दिशाभूल करणारे परिणाम, डॉक्टर/तज्ज्ञांच्या नावाचा गैरवापर या अनुषंगाने निर्देश दिले होते, या पार्श्वभूमीवर जाहिरात-नियमन आणि भ्रामक जाहिराती तसेच औषधे आणि जादुई उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) नियम, १९५५ ( Drugs and Magic Remedies Rules, 1955 )  या अनुषंगाने १० जून २०२४ रोजी यावर नियमावली लागू केली आहे.

सेलिब्रिटींच्या चेहऱ्यामागे फसवणुकीचा खेळ!

काही सिने अभिनेत्यांकडून गुटखा उत्पादनांवर राज्यात निर्बंध असतानाही त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, बडीशेप अथवा इतर तत्सम उत्पादनांच्या नावाखाली त्याच ब्रँडच्या नावाने जाहिरात केल्या जात असून अप्रत्यक्ष तंबाखू, पानमसाला आणि गुटख्यासारख्या बँडचा प्रचार केला जातो, लोकप्रिय अभिनेते आणि सेलिब्रिटी हे केवळ जाहिरातीतील चेहरे नसतात; त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि लोकप्रियतेचा प्रभाव विशेषतः तरुणांवर पडतो. त्यामुळे एखाद्या तंबाखू किंवा गुटखा ब्रँडचे नाव जाणीवपूर्वक दुसऱ्या उत्पादनाच्या आवरणाखाली पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणले जात असेल, तर ही केवळ एका इलायची किंवा बडीशेपची जाहिरात आहे, असा बचाव कितपत ग्राह्य धरायचा, हा मूलभूत प्रश्न आहे. उत्पादन बदलले असले तरी ब्रँडची ओळख, रंगसंगती, नाव, लोगो, संदेश आणि जाहिरातीची मांडणी जर ग्राहकांच्या मनात मूळ तंबाखूजन्य उत्पादनाची आठवण निर्माण करत असेल, तर त्यामागील व्यावसायिक हेतू तपासणे अपरिहार्य ठरते.

खोट्या जाहिरातींचा बोलबाला!!!

लोकप्रिय क्रिकेट स्टार्स सुद्धा दारू किंवा बीअर ब्रँडशी संबंधित कंपन्यांच्या नावाने मिनरल वॉटर, सोडा किंवा इतर तत्सम उत्पादनांच्या जाहिराती करत असून कायदेशीरदृष्ट्या अशा संबंधित जाहिरातीतून प्रत्यक्षात पाणी किंवा सोडा विकला जात असल्याचा दावा केला जाऊ शकतो; मात्र ब्रँडचे नाव, लोगो, दृश्य ओळख आणि ग्राहकांच्या मनातील त्या ब्रँडची प्रमुख ओळख जर मद्याशी जोडलेली असेल, तर हीदेखील सरोगेट जाहिरातीच्या कसोटीवर तपासली जाऊ नये का? हा प्रश्न पडतो; मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पतंजली विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांच्या खंडपीठाने पतंजलीच्या औषधांच्या जाहिरातीतील दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हणून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करा अन्यथा पुढे पतंजलीच्या खोटे दावे करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड लावण्यात येईल अशी टिपणी केली, या पार्श्वभूमीवर काही कालावधी करिता संबंधित जाहिराती बंद करण्यात आली परंतु सद्यस्थितीत परिस्थितीत जैसे थे असल्याचीच दिसून येते.

कायदे कोमात कंपनी जोमात!

 या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने सर्व प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित जाहिरातीतून आपल्या उत्पादनाच्या सेवनाने एक विशिष्ट आजार बरा होत असल्याचा दावा केला, आणि यासंदर्भात कंपनीकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमाणपत्र आहे असे ठामपणे सांगितले, परंतु प्रत्यक्षात नंतर हे खोटे असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या खुलाशाने निष्पन्न झाले, परंतु तोपर्यंत शेकडो कोट्यावधी रुपयांची या उत्पादनाची विक्री झाली, तसेच मध्यंतरी काही आयुर्वेदिक कंपन्यांच्या दंतमंजन या शाकाहारी प्रोडक्ट मध्ये समुद्र फेन वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले, यासोबतच मयूर चंद्रिका भस्म ( मोरांच्या पिसाची पावडर), कोंबणचडी गुळीका ( जनावरांच्या शिंगांची पावडर ), हस्ती भस्म ( हत्तीच्या दाताची पावडर) यासारख्या व इतर आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या औषधी मध्ये यांची सर्रास मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने निष्पाप जनावरांची कत्तल करण्यात येत असून, यासोबतच उत्पादित उत्पादन पूर्णतः शाकाहारी असल्याचे जाहिरातीतून व कंपनीच्या उत्पादनाच्या लेबलवर शाकाहारी मार्क लावून शेकडो शाकाहारी ग्राहकांची दिशाभूल करून करोडो रुपयांची कमाई करण्यात येत असून याची योग्य त्या शासकीय यंत्रणेने निष्पक्ष पडताळणी करून जनतेसमोर याची खरी सत्यता आणली पाहिजे तसेच न्यायालयाने अशा कंपन्यांवर शाब्दिक बाण न चालवता कायमस्वरूपी बंदी अथवा विक्री करण्यात आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत दंड आकारला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण झाले असे म्हणता येईल, अन्यथा समाजसेवेचे बुरखे पांघरणाऱ्या यासारख्या चोर दरोडेखोरांना बनावट जाहिरातींच्या माध्यमातून सामान्यांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी रान मोकळे होईल.

जाहिरातींची नियमावली…

१० जून २०२४ पासून केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ग्राहकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी जाहिरातींसाठी नवी नियमावली जारी केली, या नियमांनुसार उत्पादनांबाबत चुकीचे दावे करणाऱ्या आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीं जसे लहान मुलांच्या पोषणासंदर्भात उत्पादनांमध्ये चुकीचा दावा करणे, काही उत्पादक आपले प्रोडक्ट मोफत असल्याचे सांगतात परंतु प्रत्यक्षात तसे नसते. लाईफटाईम वारंटी, ‘एका सोबत एक फ्री’, ‘सात दिवसात गोरे करणाऱ्या क्रीम’ सारख्या अनेक जाहिराती, तसेच नियम आणि अटींच्या आडून ग्राहकांकडून ‘एक वर एक फ्री’च्या नावाखाली वाढीव किंमत वसूल केली जाते. याचप्रमाणे लाईफटाईम वॉरंटीच्या (Warranty) नावाखाली केवळ ४ ते ५ वर्ष वारंटी मिळते, तसेच जाहिरातीत धमकी किंवा लवकर खरेदी असा उल्लेख करणे, जाहिरातीमध्ये लहान अक्षरात नियम आणि अटी लिहिणे, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर या नियमानुसार जाहिरात देणाऱ्यासह जाहिरात करणारा आणि उत्पादक यांच्यावर दोषारोप ठेवून दोषींवर कायदेशीर कारवाई दंड करण्याची आणि उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिक्षेची तरतूद आहे.

जाहिरात नियमांची पायमल्ली!

सरकारकडून जाहिरातींसाठी नियमावली लागू असली तरी आत्तापर्यंत एकाही मोठ्या उत्पादक कंपनी अथवा उद्योगपती, उत्पादित उत्पादन, प्रॉडक्ट, मार्केटिंग ब्रँड्स, कलाकार, स्टार्स, सेलिब्रिटी, सोशल मीडिया इनफ्लूअन्सर, खेळाडू यापैकी एकावरही कायमस्वरूपी बंदी अथवा मोठी कारवाई केल्याचे निदर्शनास आले नाही, फक्त मोघम दंड अथवा शाब्दिक कानउघडणी केल्याचे दिसून येत असून अशा भ्रामक जाहिरातींच्या भूलथापांना बळी पडून सामान्य ग्राहक स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत आहे, उत्पादक तुपाशी आणि ग्राहक उपाशी असे चित्र दिसत असून, कायदे कोमात आणि उत्पादक जोमात असे म्हणावे लागेल. दैनंदिन जीवनात आपण घेत असलेली औषधे आणि इतर खाद्यपदार्थ यामध्ये काही नफेखोर व्यवसायिक राजरोसपणे भेसळयुक्त आणि पूर्णतः नकली माल उत्पादित करून मोठमोठ्या जाहिराती, प्रलोभने डिस्काउंट देऊन आरोग्याशी खेळत आहेत, कित्येकदा गिफ्ट हॅम्पर च्या नावावर एक्सपायर झालेल्या वस्तूंचे एकत्र पॅकिंग करून देत असतात, याला जबाबदार कोण? तसेच सध्या सुरू असलेली ऑनलाइन औषध विक्री यामध्ये कित्येक वेळा बनावट औषधे, ज्या औषधांचा वापर युवा वर्ग व्यसनासाठी करतो अशी औषधे सहजच घरपोच दिली जातात, यामुळे कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. “एवढ्या यंत्रणा, कायदे असून सुद्धा केवळ कामांमध्ये निष्काळजीपणा आणि कार्यतत्परतेचा अभाव यामुळे देशातील कित्येक जनसामान्यांच्या आरोग्यावर आत्तापर्यंत किती विपरीत परिणाम झाला असेल?” यावरून “उत्पादक कंपन्या जोमात आणि सामान्य ग्राहक कोमात!” असे म्हणावे लागेल.

जाहिरातींचा बाजार!

मागील वर्षी डाबर च्यवनप्राशच्या जाहिराती मधून अभिनेता अक्षय कुमार फक्त रोजचे दोन चमचे डाबर च्यवनप्राश खाल्ल्याने शंभर आजारांशी लढण्याची ताकद मिळते असा दावा करत असून चहा पावडरच्या जाहिरातीतून सुद्धा व्हायरल आजार चहा पिल्याने बरा होतो असे दावे करण्यात येतात, एका कंपनीकडून दुधातून कंपनीची पावडर घेतल्याने लहान मुलांची उंची वाढण्याचा सुद्धा दावा करण्यात येत होता, सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती, शाम्पू, साबण, आणि तेलाच्या कंपन्या तेल लावल्याने गुडघ्यापर्यंत केस वाढतील असेही दावे करतात, बहुतेक वृत्तवाहिन्या सुद्धा आपल्या चॅनेलचे अर्धा अर्धा तासाचे स्लॉट विकून अशा उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात, तसेच काही वाहन उत्पादक कंपन्या ‘एक रुपयात वाहन घरी घेऊन जा..’ अशी जाहिरात बाजी करतात, परंतु प्रत्यक्षात तसे नसते, दिवसाढवळ्या पैशांच्या बाजारात ग्राहकाला लुटले जात असून क्रिकेट खेळात सुद्धा खेळ भावना न राहता जुगाराचा अड्डा बनला आहे, क्रिकेट बाजूला राहून ड्रीम इलेव्हन, माय टीम इलेव्हन, एम पी एल प्रो, गेमझी, माय इलेव्हन सर्कल, फॅनफाईट, पेटीएम फर्स्ट गेम्स अशा ॲप्स च्या माध्यमातून आपली टीम बनवण्यासाठी आणि त्याच्यावरती पैसे लावण्यासाठी युवकांना मोठमोठे खेळाडू प्रवृत्त करत आहेत, आणि तरुणाई या भूलथापांवर विश्वास ठेवून घरच्यांचा अथवा स्वकमाईचा कष्टाचा पैसा केवळ कलाकार आणि स्टार्स यांच्या प्रलोभनांना भुलून अशा गॅम्बलिंग मध्ये लावताना दिसून येत आहे, अशा सेलिब्रिटी आणि खेळाडूंसाठी भारतातील युवा वर्ग हे केवळ त्यांचे उत्पादन (प्रॉडक्ट) विकण्याची बाजारपेठ बनली आहे की काय? असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!