पसंतीक्रम नोंदविताना चूक टाळा; मतपत्रिका अवैध होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना
सत्यउपासक/पुणे: विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदान पद्धती ही इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी पसंतीक्रम नोंदविताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमानुसार अंक नोंदवून मतदान केले जाते. त्यामुळे विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनी मतदानाची पद्धत समजून घेऊनच मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेसोबत दिलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरणे बंधनकारक आहे. अन्य पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन किंवा कोणतेही लेखनाचे साधन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.
मतदाराने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या चौकटीत ‘१’ हा अंक लिहावा. हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच असावा. त्यानंतर इच्छेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या आणि पुढील पसंतीच्या उमेदवारांसमोर अनुक्रमे २, ३, ४ इत्यादी अंक लिहिता येतात. निवडणुकीत किती उमेदवार निवडून द्यायचे आहेत याचा विचार न करता निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. मात्र पहिली पसंती म्हणजेच ‘१’ नोंदविणे आवश्यक असून त्यानंतरचे पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे.
मतदारांनी एकाच पसंतीक्रमाचा अंक दोन उमेदवारांच्या नावासमोर लिहू नये. तसेच एकाच उमेदवाराच्या नावासमोर एकापेक्षा अधिक अंक लिहू नयेत. पसंतीक्रम १, २, ३ अशा अंकांमध्येच नोंदवावा. ‘एक, दोन, तीन’ असे शब्द लिहिणे ग्राह्य धरले जाणार नाही. पसंतीक्रम आंतरराष्ट्रीय अंक, रोमन अंक, देवनागरी अंक किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील मान्यताप्राप्त भारतीय भाषांमधील संबंधित अंकांच्या स्वरूपात दर्शविता येतो.
मतपत्रिकेवर मतदाराने स्वतःचे नाव, आद्याक्षरे, स्वाक्षरी, कोणतेही अन्य शब्द किंवा खूण लिहू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण आढळल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते. उमेदवाराच्या नावासमोर केवळ √ किंवा X अशी खूण करणेही मतदानासाठी ग्राह्य नाही. पसंतीक्रम अंकामध्येच नोंदविणे आवश्यक आहे.
‘१’ हा अंक नोंदविला नाही, एकापेक्षा अधिक उमेदवारांसमोर ‘१’ लिहिला, ‘१’ कोणत्या उमेदवारासाठी आहे याबाबत संदिग्धता निर्माण झाली, एकाच उमेदवारासमोर ‘१’ सोबत ‘२’, ‘३’ इत्यादी अंक लिहिले, पसंतीक्रम शब्दांमध्ये नोंदविला किंवा मतदाराची ओळख पटेल अशी खूण केली, तर संबंधित मतपत्रिका अवैध ठरू शकते. तसेच निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनऐवजी अन्य साधनाचा वापर करून पसंतीक्रम नोंदविल्यासही मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विधान परिषद पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी मतदान केंद्रावर मतपत्रिका मिळाल्यानंतर घाई न करता सूचनांचे पालन करावे आणि आपली पहिली पसंती स्पष्टपणे ‘१’ या अंकाने नोंदवून त्यानंतरचे पसंतीक्रम आवश्यकतेनुसार नोंदवावेत, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक-२०२६
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारीही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार- विभागीय आयुक्त शीतल तेली–उगले
सत्यउपासक/पुणे, दि. १ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर अशी आहे; येत्या शनिवारी (३ ऑक्टोबर रोजी) प्रशासकीय सुट्टी असली तरी उमेदवारांकडून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतली जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली आहे.