महात्मा गांधी; सत्य, अहिंसा आणि आधुनिक भारताचा आरसा..!
सत्यउपासक विशेष लेख: आज २ ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात; त्यांनी दिलेले आदर्श आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात का? का आपण फक्त त्यांची जयंती साजरी करून पुढे जातो? आजच्या संघर्षमय, हिंसक भवतालात गांधींच्या विचारांकडे कसे पाहायचे, हा प्रश्न अधिकच गडद होतो. गांधीजींच्या विचारांची आज केवळ औपचारिक आठवण ठेवली जाते का, की ती प्रत्यक्ष आचरणात आणली जातात, हा प्रश्न आजच्या परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो. सत्य, अहिंसा, आणि बंधुतेचा संदेश त्यांनी दिला, पण आजच्या संघर्षमय आणि हिंसक वातावरणात या तत्त्वांचे स्थान कुठे आहे? ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर तोडून खाल्ली या म्हणीप्रमाणे गांधींच्या विचारांची स्थिती झाली आहे का? त्यांचे विचार केवळ पुण्यतिथी किंवा जयंत्यांच्या भाषणांपुरते मर्यादित राहिले आहेत का? गाधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश आणि सामाजिक समतेचा विचार आज किती प्रमाणात लागू आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कारण जर गांधीजी केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणूनच आठवले जात असतील आणि त्यांचे विचार विस्मरणात जात असतील, तर आपण त्यांना प्रत्यक्ष पटलावर टिकवण्यास अपयशी ठरत आहोत.
गांधींचा मार्ग; शाश्वत समाधानाचा शोध!!!
आजच्या भौतिकवादी जगात विषमता इतकी टोकाला गेली आहे की, ती आकाशाला भिडली आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी ‘नफेश्वरा’ची पूजा होत आहे, आणि पैसा कमावण्याचे अंतिम ध्येय हे केवळ धनसंचय आणि सामाजिक प्रतिष्ठा कमावणे बनले आहे. परिणामी, मानसिक असंतुलन, सामाजिक तणाव आणि अस्मितांचे संघर्ष वाढत आहेत. गांधीजींच्या विचारांचा आधार घेतल्यास, या गोंधळलेल्या परिस्थितीत शाश्वत समाधानाचा मार्ग दिसतो का? सत्य,अहिंसा आणि साधेपणाच्या तत्त्वांवर ठरू शकते का? गांधीजी म्हणत, स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवा आणि इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करा. मात्र आज आपण याच्या पूर्ण उलट दिशेने जात आहोत. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक गरीब होत आहेत, आणि या आर्थिक असमानतेतून असंतोष, संघर्ष, आणि हिंसाचार वाढत आहे. जर आपल्याला मानसिक शांती आणि समाजातील समतोल साधायचा असेल, तर गांधीजींच्या विचारांचा केवळ पुरस्कार न करता त्यांचे प्रत्यक्ष आचरण करावे लागेल.
गांधी आणि कर्मयोग…
गांधीजींनी कर्मयोगाचा जो मार्ग दाखवला, तो केवळ राजकीय परिवर्तनासाठी नव्हे, तर आत्मशुद्धी आणि सामाजिक पुनर्बांधणीसाठी होता. त्यांनी अहिंसेच्या शक्तीवर विश्वास ठेवत अन्यायाविरुद्ध लढा दिला. मात्र, आज आपण त्यांच्या विचारांपासून किती दूर आलो आहोत? धर्मविहीन राजकारण हा विनाशाचा सापळा आहे, असे गांधीजी म्हणाले होते. पण आजच्या राजकारणात धर्माचा उपयोग समाजाला जोडण्यासाठी नव्हे, तर विभागण्यासाठी होत आहे. सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेते धर्माचा गैरवापर करत आहेत, आणि सामान्य माणूस त्यात अडकून हिंसेकडे वळत आहे. गांधीजींचे राजकारण मोक्षप्राप्तीसाठी होते, तर आजचे राजकारण केवळ सत्ता आणि संपत्तीसाठी आहे. मग गांधीजी आपल्यासाठी आदर्श आहेत का, की फक्त एक पुतळा, ज्याला आपण पूजतो पण त्यांचे विचार मात्र विसरतो? जर खऱ्या अर्थाने गांधींच्या कर्मयोगाचा स्वीकार करायचा असेल, तर तो केवळ श्रद्धेपुरता न ठेवता कृतीत उतरवावा लागेल. अन्यथा, गांधींचे विचार केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहतील, आणि आपली वाटचाल अधिकाधिक गोंधळ आणि संघर्षाच्या दिशेने होत राहील.
गांधीजींची असहाय्यता आणि फाळणीची अनंत वेदना…
देशाच्या फाळणीने लाखो लोकांचे आयुष्य उद्धस्त केले, आणि त्याच वेळी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वांचीही कठोर परीक्षा घेतली. एकीकडे भारत व पाकिस्तानमध्ये रक्तपात सुरू असताना, दुसरीकडे गांधीजी दिल्लीत उपोषण करत होते, हिंसा थांबवण्यासाठी, एकतेचा संदेश देण्यासाठी. पण त्यांच्या प्रयत्नांसमोर कट्टरतेचे वादळ अधिक प्रबळ ठरले; फाळणी माझ्या देहाच्या तुकडयांवरून होईल, असे म्हणणारे गांधी शेवटी ती रोखू शकले नाहीत. त्यांची भूमिका असहाय्य वाटली, पण त्यांचे विचार मात्र अडगळीला पडले नाहीत, ते आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात, जर आपण त्यांचा खरा अर्थ समजून घेतला तर, गांधीजींनी अहिंसा आणि एकतेचा संदेश दिला, पण आज आपण त्यांच्या नावाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करत आहोत का? त्यांच्या विचारांची खोली समजून घेण्याऐवजी फक्त त्यांच्या प्रतिमेची पूजा करत आहोत का? जर गांधीजींच्या विचारांना आपण फक्त सोयीपुरतेच वापरणार असू, तर त्यांचे बलिदान आणि त्यांची शिकवण दोन्ही निष्फळ ठरेल. प्रश्न असा आहे; आजच्या विषारी राजकारणात गांधींच्या विचारांचा वापर शांततेसाठी आणि ऐक्यासाठी केला जातो का, की केवळ प्रतिष्ठेसाठी?
गांधी विचार आणि आजचा असहिष्णु समाज…
आज सामाजिक तणाव वाढत असून धर्माच्या नावाखाली हिंसा होताना दिसते; आजचे राजकारण अधिकाधिक स्वार्थी बनले असले तरी पण गांधींनी दिलेला संदेश आजही तितकाच उपदेशाचा आहे, कारण द्वेषाच्या आगीत सगळ्यांचाच नाश होतोच हे आजवरच्या इतिहासात अनेक वेळा पाहिले असून आजच्या धार्मिक राजकारणात दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे, आधीच तणावग्रस्त समाजात द्वेषाचे राजकारण अधिक आग लावत असून या परिस्थितीत स्वामी विवेकानंद यांचे वाक्य ‘भारत टिकून आहे तो सहिष्णुतेमुळेच.’ हे आठवते!!! गांधींचीही तीच शिकवण होती. ते म्हणत, ‘आपला अहंकार कमी झाला की दुसऱ्यातील ईश्वरदर्शन सहज शक्य होतं.’ पण आपला अहंकार एवढा वाढला आहे की, आपल्याला कुठेही सहिष्णुता, बंधुत्व दिसत नाही.
गांधींच्या विचारांचा पुनर्विचार…
गांधींचे विचार अव्यवहार्य होते की आपणच त्यांचे योग्य आकलन करू शकलो नाही की आपल्याच संकुचित विचारसरणीत आपण अडकून पडलो आहोत? या विचारासोबतच आपल्याला खरंच पुढे जायचं असेल, तर गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या, सहिष्णुतेच्या आणि कर्मयोगाच्या शिकवणीकडे पुन्हा वळावं लागेल, याकरिता गांधींना स्वीकारलं पाहिजे; गांधींना स्वीकारणं म्हणजे त्यांचा पोशाख परिधान करणं नव्हे, तर त्यांचे विचार आचरणात आणणं हे होय, अन्यथा, ‘नाव मोठं आणि लक्षण खोटं’ अशी आपली अवस्था होईल. गांधींची जयंती आणि पुण्यतिथी केवळ कार्यक्रम साजरा करण्यापुरती मर्यादित राहू नये, तर त्यांच्या विचारांचा पुनर्विचार करण्याची संधी म्हणून तिचा उपयोग झाला पाहिजे. गांधींच्या विचारांचा स्वीकार आणि नाकार हा आजच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण गांधींच्या विचारांना नाकारले आणि त्यांच्या स्थळी हिंसा, द्वेष, अहंकार आणि स्वार्थी राजकारण स्वीकारले पण या प्रश्नाचे उत्तर तपासण्यासाठी गांधींच्या विचारांचा स्वीकार केल्यास काय होईल, हे देखील सोडून देता येत नाही, गांधींच्या विचारांची एक नोंद ठरवणारी वैशिष्ट्ये म्हणजे अहिंसा, सहिष्णुता, सत्य, धर्मनिरपेक्षता आणि निस्वार्थ समाजसेवा असून ते नेहमीच असं म्हणत की, माझ्या अहंकाराने माझ्या साथीला दुश्मन बनवले, परंतु दुसऱ्याच्या अहंकाराला सहिष्णुतेने नवा आयाम मिळवला. गांधींच्या जीवनात या मूल्यांचे तत्त्वज्ञान होते, आणि ते लोकांच्या मनोवृत्तीमध्ये गडद पाय ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही मला मारू शकता, पण माझा भेदभाव करणार नाहीत, हे गांधींचे प्रमुख आदर्श होते, आपण गांधींच्या विचारांचा नाकार केला आणि त्याच्या स्थळी आक्रमकता आणि हिंसा स्वीकारली परंतु आज आपण विचार करावला हवं, की गांधींच्या अहिंसक मार्गाचा स्वीकार करून कदाचित आपण अधिक शांतता, सहिष्णुता आणि एका सशक्त समाजाचे निर्माण करू शकलो असतो परंतु, गांधींच्या विचारांना नाकारून, आपण उभा केलेला समाज मानसिक असंतुलन, हिंसा, द्वेष, आणि धार्मिक स्वार्थी राजकारणाने बरबटलेला आहे. गांधींचा स्वीकार केल्याने आपल्या व्यक्तिमत्व आणि चारित्र्यासोबतच त्यांच्याशी जोडलेल्या नैतिक मूल्यांच्या आधारावरच आपल्याला एके दिवशी अहिंसा आणि सहिष्णुतेच्या मार्गाने समाज सुधारता येईल. आणि त्यामुळे आपणास मनाने अधिक समाधान मिळेल, गांधींच्या विचारांना नाकारून आपण शाश्वत समाधान आणि समाजाच्या समृद्धीच्या मार्ग कायमचेच बंद करून टाकले असून शेवटी गांधी नाकारून आपण काय मिळवलं?’ हा प्रश्न विचारण्याआधी ‘गांधी स्वीकारून आपण काय कमावलं असतं?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.