ACB Action Civil Hospital Satara Staff Caught Red Handed

गर्भपात व कुटुंब नियोजन सोनोग्राफी केंद्र परवान्यासाठी लाच; साताऱ्यात अँटी करप्शन विभागाची कारवाई…

परवाना मंजुरीसाठी ५० हजार घेताना शिपाई जाळ्यात!

सातारा, दि. १७: सरकारमान्य गर्भपात व कुटुंब नियोजन सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक शासकीय परवान्यांच्या मंजुरीसाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील शिपाई आनंदा वाळवेकर याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून १७ एप्रिल २०२६ रोजी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्हा शल्यचिकित्सक विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे भागीदारीत हॉस्पिटल चालवत असून त्यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर, सरकारमान्य गर्भपात केंद्र व कुटुंब नियोजन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक परवान्यांसाठी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे प्रस्ताव दाखल केला होता. हे प्रकरण सिव्हिल सर्जन डॉ. करपे यांच्याकडे प्रलंबित असताना तक्रारदारांची भेट शिपाई आनंदा वाळवेकर यांच्याशी झाली. त्यावेळी वाळवेकर यांनी संबंधित परवान्यांच्या मंजुरीसाठी सिव्हिल सर्जन यांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ९ मार्च २०२६ रोजी ACB कडे दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पथकाने ९ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान विविध टप्प्यांत पडताळणी कारवाया केल्या. १६ मार्च रोजीच्या पडताळणीमध्ये आरोपी वाळवेकर यांनी पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १७ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला होता.

सदर कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवक आनंदा वाळवेकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे हॉस्पीटल साठी आवश्यक असलेली सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र परवान्याची प्रमाणपत्रे देवून त्यांचेकडून ५०,०००/- रु लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, या प्रकरणी आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पथकात पोलीस हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, चालक महेश पुजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात व नवनाथ शिंदे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.

या घटनेमुळे आरोग्य विभागात परवाना प्रक्रियेत दलाली व भ्रष्टाचाराचे जाळे किती खोलवर पसरले आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!