सत्यउपासक विशेष वृत्त: आज आरोग्यसेवा क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री, महागडी उपकरणे, वातानुकूलित कक्ष आणि भव्य इमारती यांना आधुनिकतेचे प्रतीक मानले जाते. मात्र, रुग्णालयाच्या भिंती किती भव्य आहेत किंवा उपचारांचे बिल किती मोठे आहे, यापेक्षा रुग्णाला मिळणारी सेवा किती सुरक्षित, अचूक आणि जबाबदार आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
रुग्णालयात दाखल होणारा प्रत्येक रुग्ण आपल्या आजारावर योग्य उपचार होतील, डॉक्टरांकडून अचूक निदान केले जाईल आणि उपचारांसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सुरक्षित व कार्यक्षम असेल, या विश्वासावर रुग्णालयाच्या दारात पाऊल ठेवतो. अनेकदा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपली आर्थिक परिस्थिती बाजूला ठेवून उपचारांसाठी कर्ज काढतात, आयुष्यभराची बचत खर्च करतात आणि प्रसंगी मालमत्ताही विकतात. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांची प्रत्यक्ष कार्यक्षमता, त्यांची नियमित देखभाल, कॅलिब्रेशन आणि तपासणी अहवालांची विश्वासार्हता याबाबतच प्रश्न उपस्थित होत असतील, तर सामान्य रुग्णांनी आपल्या जीवाची हमी नेमकी कोणाकडून मागायची, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. ‘सत्यउपासक वृत्त समूहा’ने विविध क्लिनिक आणि रुग्णालयांमध्ये केलेल्या प्राथमिक पाहणीदरम्यान अगदी साध्या वजनकाट्यांच्या कार्यक्षमतेबाबत आलेल्या अनुभवांमुळे रुग्णालयांमधील वैद्यकीय उपकरणां संदर्भात येथील कर्मचारी रुग्णालयातील डॉक्टर यांच्याकडून घेतलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
आरोग्य सेवेचे बाजारीकरण…
आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णालयांच्या इमारती, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि महागड्या उपचारांचा मोठा गाजावाजा केला जातो. परंतु रुग्णालयाची खरी गुणवत्ता ही केवळ भव्य इमारती किंवा उपकरणांच्या संख्येवर ठरत नाही; त्या उपकरणांची कार्यक्षमता, देखभालीची शिस्त, संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेची हमी यावर ठरते. रुग्ण उपचारांसाठी मोठी रक्कम खर्च करतो, अनेकदा कर्जबाजारी होतो; अशा परिस्थितीत त्याला सुरक्षित आणि दर्जेदार उपचार मिळणे हे त्यावर केलेले उपकार नसून त्याचा मूलभूत हक्क आहे. रुग्णाच्या असहायतेचा फायदा घेऊन आवश्यक तांत्रिक तपासण्यांकडे दुर्लक्ष होत असेल किंवा केवळ कागदोपत्री पूर्ततेला प्राधान्य दिले जात असेल, तर ते रुग्णसेवेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे ठरेल.
‘सत्यउपासक’च्या पाहणीदरम्यान वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वजनकाट्यावर एकाच व्यक्तीचे वजन तपासले असता, काही ठिकाणी ७५ किलो, तर काही ठिकाणी ८०, ७८ किंवा ८४ किलो असे वेगवेगळे आकडे दिसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. अर्थात, ही सर्व मोजमापे एकाच व्यक्तीची, एकाच परिस्थितीत, एकाच प्रमाणित संदर्भ वजनाच्या आधारे आणि नियंत्रित पद्धतीने करण्यात आली, यानंतर संबंधित डॉक्टरांकडे वजनकाट्यांच्या कॅलिब्रेशनविषयी विचारणा केल्यानंतर डॉक्टरांनी वजनकाटे नादुरुस्त असून सदर वजन काटे तातडीने हलवून कपाटात ठेवण्यात आले, यामुळे रुग्णालयात असलेला इतर यंत्रसामग्री ते आय सी यु मधील यंत्रसामग्री याविषयी मनात शंकेची पाल चुकचुकली वजनकाटा चुकीचे मोजमाप दाखवत असेल, तर त्याचा परिणाम केवळ रुग्णाच्या वजनाच्या नोंदीपुरता मर्यादित राहीलच असे नाही. काही औषधांचे डोस, विशेषतः वजनानुसार ठरवली जाणारी औषधे, तसेच बालरुग्णांमधील औषधांचे प्रमाण आणि काही वैद्यकीय गणना यासाठी अचूक वजन महत्त्वाचे असते. प्रत्येक वजनातील फरकामुळे उपचार चुकीचे होतात असे नाही; मात्र वैद्यकीय निर्णयासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाची अचूकता सुनिश्चित करणे ही रुग्णालय व्यवस्थापनाची मूलभूत जबाबदारी आहे. साध्या वजनकाट्याच्या बाबतीतच अशी शंका निर्माण होत असेल, तर रक्तदाबमापक, रक्तविश्लेषण यंत्रे, ऑक्सिजन मोजणारी उपकरणे, व्हेंटिलेटर, भूल देण्याची यंत्रणा, इन्फ्युजन पंप, डिफिब्रिलेटर आणि ऑपरेशन थिएटरमधील इतर महत्त्वाच्या यंत्रसामग्रीची देखभाल व कार्यक्षमता यांची खात्री कशी केली जाते, या अनुषंगाने पुढील मोहीम हाती घेण्यात आली.
रुग्णालयांच्या यंत्रसामग्रीसाठी शासकीय नियम…
रुग्णालयांमध्ये रुग्णांचे वजन मोजणाऱ्या वजनकाट्यांपासून ते उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय यंत्रसामग्रीपर्यंत आणि आयसीयू व ऑपरेशन थिएटरमधील HEPA फिल्टरसारख्या महत्त्वाच्या घटकांपर्यंत प्रत्येक उपकरणाची सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता नियमितपणे तपासली जाणे आवश्यक आहे; संबंधित उपकरणांसाठी लागू असलेल्या नियमांनुसार कॅलिब्रेशन, तांत्रिक तपासणी आणि प्रमाणित नोंदींचे पालन होणे अपेक्षित आहे, याकरिता वैद्यकीय यंत्रसामग्रीचे कॅलिब्रेशन, तांत्रिक तपासणी, देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतात विविध कायदे, नियम व शासकीय मार्गदर्शक तत्त्वे लागू असून Legal Metrology Act, 2009 आणि त्याअंतर्गत लागू नियमांनुसार कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वजन-मापन उपकरणांची पडताळणी व पुनर्रपडताळणी केली जाते, वैद्यकीय उपकरणांच्या नियमनासाठी केंद्र शासनाचे Medical Devices Rules, 2017 लागू असून, उपकरणाचा प्रकार आणि संबंधित तरतुदींनुसार त्याचे नियमन केले जाते. सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील उपकरणांची देखभाल, कॅलिब्रेशन आणि चाचण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांच्या Biomedical Equipment Management and Maintenance Program (BEMMP) अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध असून केंद्र शासनाच्या Indian Public Health Standards (IPHS), 2022 मध्ये सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या सुविधा, उपकरण व्यवस्थापन आणि देखभालीसंबंधी मानके नमूद आहेत. याशिवाय, रुग्णालयांनी NABH मानांकन घेतले असल्यास संबंधित मानांकनाच्या लागू निकषांचे पालन आवश्यक ठरते. NABH च्या ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलनविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रणालीचे सहा महिन्यांनी व्हॅलिडेशन, हवेची गुणवत्ता, हवेचा प्रवाह, दाबातील फरक आणि HEPA फिल्टरच्या चाचण्यांसंबंधी तरतुदी नमूद असून संबंधित रुग्णालयाला लागू असलेले परवाना निकष, शासन निर्णय, अधिसूचना, तांत्रिक मानके, उत्पादकाच्या सूचना आणि मानांकनाच्या अटी यांच्या आधारे तपासणीची वारंवारता व पद्धत निश्चित करणे आवश्यक आहे.
रुग्णालयांची सद्यस्थिती…
सत्यउपासकच्या पाहणी दरम्यान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण ४० खाटांच्या रुग्णालयात उपकरणांच्या प्रकारानुसार शेकडो वैद्यकीय आणि सहाय्यक यंत्रांचा वापर होऊ शकतो. मात्र, अशा रुग्णालयात नेमकी २०० ते २५० उपकरणे असतात किंवा त्या प्रत्येक उपकरणाचे दरवर्षी एकाच पद्धतीने कॅलिब्रेशन करणे अनिवार्य असून उपकरणाचा प्रकार, उत्पादकाच्या सूचना, वापराची तीव्रता, जोखीम, संबंधित तांत्रिक मानके आणि लागू नियामक अटी यानुसार तपासणी व कॅलिब्रेशनचे वेळापत्रक निश्चित केले जाते. काही उपकरणांना नियमित कॅलिब्रेशन आवश्यक असते, तर काहींसाठी कार्यक्षमता चाचण्या, प्रतिबंधात्मक देखभाल, विद्युत सुरक्षितता चाचण्या किंवा विशिष्ट अंतराने तांत्रिक तपासणी आवश्यक असते, सर्वात मुख्य म्हणजे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये असणारे अतिदक्षता विभाग आयसीयू मध्ये करण्यात येणाऱ्या ऑपरेशन्स आणि सर्जरी येथे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असून शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या शरीरात संसर्गकारक सूक्ष्मजीवांचा प्रवेश होण्याचा धोका कमी करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमधील हवा पुरवठा, वायुवीजन, दाब नियंत्रण, स्वच्छता आणि गाळणी व्यवस्था योग्य स्थितीत असणे आवश्यक असते. या व्यवस्थेमध्ये अनेक ठिकाणी HEPA Filter अर्थात ‘हाय-एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर’ वापरले जातात. हे फिल्टर हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतातर हे ऑपरेशन थिएटरमधील HEPA फिल्टर दरवर्षी बदलणे बंधनकारक असून याचप्रमाणे, ऑपरेशन थिएटरमधील व्हेंटिलेटर, भूल देण्याची यंत्रणा, रुग्णाच्या हृदयाचे ठोके व ऑक्सिजन पातळी मोजणारे मॉनिटर, औषधांचा अचूक पुरवठा करणारे इन्फ्युजन पंप आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाणारे डिफिब्रिलेटर यांच्या कार्यक्षमतेची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे, परंतु ‘सत्यउपासक’च्या पाहणीदरम्यान बहुतेक रुग्णालयांमध्ये केवळ ऑनलाइन उपकरणांच्या यादीच्या आधारे तपासणी अहवाल मिळवले जात असून नियमांचे प्रत्यक्ष पालन करण्याऐवजी नियमांतील त्रुटींचा किंवा देखरेखीतील उणिवांचा फायदा घेऊन, आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात प्रत्यक्ष तपासणी न करताच तपासणी अहवाल देणाऱ्या संस्थेकडून आवश्यक मानकांची पूर्तता झाल्याचे दर्शविणारे अहवाल दिले जातात, वजनकाट्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांपर्यंत तसेच आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरमधील HEPA फिल्टर प्रणालीपर्यंत प्रत्येक तपासणीचा उद्देश रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा असताना, तपासणी करणाऱ्या संस्था प्रत्यक्ष चाचण्या न करता केवळ कागदोपत्री प्रमाणपत्रे दित असून रुग्णालयाच्या फाईलमध्ये प्रमाणपत्र असणे आणि उपकरण प्रत्यक्षात सुरक्षित व अचूक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; त्यामुळे कागदी अहवालांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करूनच रुग्णांनी सुरक्षिततेची खात्री करावी.
सत्यउपासकचा रोखठोक आरोप आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
रुग्णालयांमधील HEPA फिल्टर, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरशी संबंधित यंत्रसामग्रीचे ऑडिट व तांत्रिक तपासणी करताना संबंधित विभाग प्रत्यक्षात किती काळ बंद ठेवणे आवश्यक असते, याची तज्ज्ञ समितीमार्फत स्पष्टता होणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित तपासणी किंवा दुरुस्तीसाठी विभाग बंद ठेवणे आवश्यक असल्याचे तांत्रिक निकष असतील आणि त्याच काळात आयसीयू किंवा ऑपरेशन थिएटर अखंड सुरू असल्याचे आढळले, तर त्या तपासणीचे गांभीर्य आणि अहवालांच्या सत्यतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सत्यउपासकचा ठाम आरोप आहे की, संबंधित रुग्णालयांमध्ये HEPA फिल्टर आणि इतर महत्त्वाच्या यंत्रसामग्रीची तपासणी नेमकी कोणत्या दिवशी झाली, फिल्टर किंवा उपकरणे कधी बदलण्यात आली, त्या दिवशी आयसीयू अथवा ऑपरेशन थिएटर प्रत्यक्षात बंद होते का, त्या आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते का आणि त्या ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया झाली होती का, याची नोंद प्रत्यक्ष रुग्ण नोंदी, ऑपरेशन रजिस्टर, देखभाल नोंदवही, उपकरणांच्या चाचणी अहवाल आणि संबंधित संस्थांच्या मूळ दस्तऐवजांशी पडताळून पाहिली पाहिजे. कागदोपत्री तपासणी दाखवून प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी टाळली गेली आहे का, अहवाल वस्तुस्थितीशी जुळतात का आणि रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड झाली आहे का, याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. चौकशीत अहवाल बनावट किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित रुग्णालये, तपासणी संस्था आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. कारण रुग्णांच्या जीवाशी संबंधित यंत्रसामग्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ कागदपत्रांचा खेळ नाही; तो थेट मानवी जीविताशी निगडित आहे. अहवाल कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष तपासणीच्या पुराव्यांवर सिद्ध करून सत्याची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी अपरिहार्य आहे.