Murrel Fish Seed Production in Maharashtra

महाराष्ट्रातील पहिल्या मरळ मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे आंबेगावात उद्घाटन!

ICAR-CIFEच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हॅचरी कार्यान्वित; मरळ मत्स्यपालनासाठी स्थानिक क्लस्टर उभारण्याचे डॉ. एन.पी. साहू यांचे आवाहन!!

सत्यउपासक वृत्त/ पुणे: महाराष्ट्रातील मरळ मत्स्यपालनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्यातील पहिल्या मरळ मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे उद्घाटन आंबेगाव तालुक्यातील कानसे येथे दि. १८ सप्टेंबर रोजी झाले. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली NASF Young Scientist Project अंतर्गत ही हॅचरी कार्यान्वित करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

मंचर-भीमाशंकर रोडवरील शास्त्रीनगर, कानसे येथील  रामकिशन बो-हाडे यांच्या मत्स्यपालन केंद्रावर उभारण्यात आलेल्या या मरळ (Channa striata) मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे उद्घाटन ICAR-CIFE, मुंबईचे संचालक व कुलगुरू डॉ. एन.पी. साहू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात मरळ मत्स्यपालनाचे स्थानिक पातळीवर क्लस्टर विकसित करण्याची गरज असल्याचे डॉ. साहू यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मरळ मत्स्यपालनाचा विस्तार केल्यास शेतकऱ्यांना मत्स्यपालनातून उत्पन्नवाढीची संधी उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात मरळ मत्स्यबीज निर्मितीच्या क्षेत्रातील ही पहिली हॅचरी असून, राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. मरळ मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे, आधुनिक मत्स्यतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि मत्स्यशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या हॅचरीच्या उभारणीसाठी ICAR-CIFEचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण रसाळ यांनी विशेष प्रयत्न केले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेततळे आणि बायोफ्लॉक टँक असलेल्या शेतकऱ्यांना मरळ मत्स्यपालन, संवर्धन आणि आधुनिक मत्स्यतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित निवडक शेतकऱ्यांना मरळ मत्स्यबीजाचे वितरण करण्यात आले. त्यामुळे मरळ मत्स्यपालनाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह मत्स्यबीजाची उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कार्यक्रमास प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे श्री. विजय शिखरे, ICAR-CIFEचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण रसाळ, KVK नारायणगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. धनेश पडवळ, आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य श्री. संजय गवारी, माजी सभापती श्री. केलासबुवा काळे, माजी उपसभापती श्री. नंदकुमार सोनावले, मविअ सआम-पुणेचे श्री. तुषार वाळुंज, मविअ प्राउम-पुणेचे श्री. गजानन काटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. रामकिशन बो-हाडे यांच्या मत्स्यव्यवसायाच्या मागील १५ वर्षांहून अधिकच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून आत्मीयतेने काम करणाऱ्या बो-हाडे कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ८० हून अधिक मत्स्यशेतकरी, शेततळेधारक, बायोफ्लॉक मत्स्यपालक, मत्स्यबीज उत्पादक तसेच मत्स्यउद्योजक होऊ इच्छिणारे नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!