Jejurkar Moved Katkar Takes Charge.

विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकरांना तडकाफडकी हलवले नेमके कारण काय?

पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालकपदी सुभाष काटकर!!!

सत्यउपासक वृत्त/ दि.६: राज्यात दुष्काळी स्थिती असून राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणी करता दिल्लीहून केंद्रातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांचे पथक राज्यात येणार असून कृषी विभागात मात्र बदल्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांना तडकाफडकी हलवले असून, त्यांच्या जागी नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामातील नुकसानीसह आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी कृषी विभागावर असताना झालेल्या या बदलीमुळे कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये या घटनांच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

यापूर्वी पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली होती. काचोळे हे महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग-१ संघटनेचे अध्यक्ष असून पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्याने ते बदलीस पात्र होते. मात्र, विभागीय कृषी सहसंचालक पदावरील बाबासाहेब जेजुरकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने त्यांना नेमके कोणत्या प्रशासकीय कारणामुळे हलवण्यात आले, तथापि, हटवल्यानंतर त्यांच्या नवीन नियुक्ती बाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याने कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात चर्चा सुरू आहे.

साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत नियमित प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया केली जात नाही. त्यातच राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान, आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्न गंभीर असताना विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये करण्यात आलेल्या बदल्यांमुळे या निर्णयाची वेळ आणि त्यामागील प्रशासकीय कारणे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान कृषी विभागातील आकृतिबंधाच्या प्रश्नावरून जेजुरकर हे महासंघाचे अध्यक्ष असल्याने आकृतिबंधासह तांत्रिक संवर्गातील विविध प्रश्नांवर त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांना हटवल्यामुळे महासंघाच्या इतर तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला का, अशी चर्चाही कृषी विभागात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

 नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांची नाशिकहून पुणे विभागीय कृषी सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याने आता पुणे विभागाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. एकीकडे दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे कृषी यंत्रणेची कसोटी लागलेली असताना, दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शासन आणि कृषी विभागाने स्पष्ट प्रशासकीय भूमिका मांडणे अपेक्षित आहे. जेजुरकर यांची बदली नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!