सत्यउपासक वृत्त/ पुणे: कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतिबंध रद्द करण्याची प्रमुख मागणी मंत्रिमंडळाने मान्य केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघासह सहभागी कृषी तांत्रिक अधिकारी-कर्मचारी संघटनांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, कृषिमंत्री, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि सर्व संबंधितांच्या पाठिंब्यामुळे प्रमुख मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल महासंघाच्या वतीने संबंधितांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
आकृतिबंध रद्द करण्याची मागणी मान्य झाली असली तरी अन्य काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या मागण्यांचा महासंघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, त्यांची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर आंदोलन स्थगितीनंतरची पुढील कार्यवाही आणि भूमिका निश्चित केली जाणार आहे. याबाबतचे निर्णय वेळोवेळी संबंधित संवर्ग संघटनांच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आंदोलन स्थगित केल्यानंतर कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सेवेत संपूर्ण ताकदीने उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या काळातही दुष्काळ तसेच महत्त्वाच्या सेवांशी संबंधित कामांमध्ये कृषी अधिकारी-कर्मचारी सातत्याने शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत होते. आता विविध ॲप प्रणाली, लॅपटॉप आणि सिमकार्ड यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून विभागीय कामकाजाला गती द्यावी, असेही महासंघाने म्हटले आहे.
महासंघाचे निर्णय विविध संघटनांकडून त्यांच्या सदस्यांमधून व्यक्त होणाऱ्या मतप्रवाहांच्या आधारे आणि सर्वसमावेशक पद्धतीने घेतले जातात. त्यामुळे भविष्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या विचारविनिमय प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही महासंघाने केले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, पुणे; महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटना; महाराष्ट्र राजपत्रित कृषी अधिकारी (जि.प.) संघटना; महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना, पुणे; महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२ राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटना, पुणे; तसेच महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, पुणे या संघटनांचा सहभाग होता.